प्रियकराच्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सादिया जाहिर शेख (वय २१) असे मृत तरुणीचे नाव असून, ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राउंड स्टाफ म्हणून कार्यरत होती. तरुणीच्या मृत्यूनंतर नेरूळ पोलिसांनी आरोपी प्रियकर दानिश मोहम्मद अन्सारी याच्या विरोधात दाखल गुह्यात हत्येचे कलम वाढवले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामावर जाण्यासाठी सादिया मंगळवारी सकाळी जीटीबीनगर रेल्वे स्थानकातून लोकलने नेरूळ येथे आली होती. सकाळी सुमारे ६.४५ वाजता ती नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराबाहेरील बस थांब्याजवळ जात असताना, तिच्या मागावर असलेल्या दानिशने तिला बस थांब्याजवळ गाठले. त्यानंतर त्याने तिच्या पाठीवर, पोटावर, मानेवर आणि छातीवर पाच ते सहा वार करून घटनास्थळावरून पलायन केले होते. सादिया आणि दानिश हे दोघेही मुंबईतील वडाळा येथील अँटॉप हिल परिसरात राहतात. चार वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत कुटुंबीयांनाही त्यांनी माहिती दिली होती, मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. सादियाचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय दानिशला होता. या संशयातून त्याने यापूर्वीही सादियाला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विमानतळ परिसरात तसेच अँटॉप हिल पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. सततच्या त्रासामुळे सादियाने दानिशपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मंगळवारी त्याने तिच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादियाला तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.