चिंचवड ः पंचक्रोशीतील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचवडगाव येथील श्री कालिका देवी मंदिराला धार्मिक महत्त्व आहे. ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून ख्याती असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते.
कै. सरदार रामभाऊ गावडे यांनी १९६९ मध्ये या मंदिराची स्थापना केली. गावडे हे मांढरदेवच्या काळूबाईचे भक्त होते. मात्र, वयोमानामुळे त्यांना मांढरदेव येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होईनासे झाले. त्यामुळे देवीचे दररोज दर्शन घेता यावे, या श्रद्धेतून त्यांनी स्वतःच्या जागेत कालिका देवीच्या मूर्तीची स्थापना केली. तत्कालीन ग्रामपुरोहित दिवंगत गोविंद रबडे यांच्या पौरोहित्यात हा धार्मिक विधी पार पडला. तेव्हापासून हे मंदिर चिंचवडगाव आणि परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे.
दरवर्षी पौष पौर्णिमेनिमित्त मंदिरात देवीची यात्रा भरते. या यात्रेला शहरासह परिसरातील गावांमधून हजारो भाविक उपस्थित राहतात. नवरात्र महोत्सवातही मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो. नऊ दिवस भजन,कीर्तन आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. बालकलाकारांसाठी चित्रकला आणि वेशभूषा स्पर्धा, तर महिलांसाठी पाककला आणि रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात.
धार्मिक कार्याबरोबरच आरोग्य सेवा, सामाजिक बांधिलकी जपण्यावर मंदिर व्यवस्थापनाचा भर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर, आरोग्यविषयक उपक्रम आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मंदिराची देखभाल, दैनंदिन पूजाअर्चा आणि विविध उत्सवांचे नियोजन अधिक व्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने व्हावे, यासाठी गावडे परिवाराने २०१८ मध्ये ट्रस्टची स्थापना केली. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सेवेचा संगम असलेले श्री कालिका देवी मंदिर चिंचवडगावच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.