पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी (ता. ३) दुपारी पक्ष कार्यालयात आल्यानंतर अनेक पदाधिकारी उपस्थित नसल्याने बैठक सुरू होत नव्हती. त्यामुळे संतापलेले राज ठाकरे पक्ष कार्यालयातून निघून थेट मुंबईला गेल्याची घटना घडली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पुणे दौऱ्यावर असल्याने राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी शाखा प्रमुखापासून संघटकांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी निरोप देण्यात आला होता. राज ठाकरे दुपारी दोनच्या सुमारासच नवी पेठेतील पक्ष कार्यालयात पोचले. त्या वेळी राज्य पातळीवरचे काही पदाधिकारी वगळता इतर स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी पोचले नव्हते. राज ठाकरे यांनी थोडा वेळ वाट पाहिली, मात्र अडीच वाजून गेले तरी बैठक सुरु झाली नाही.
दुसरीकडे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पक्ष कार्यालयाबाहेर राज ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मात्र, ‘मला प्रसार माध्यमांशी काही बोलायचे नाही,’ असा निरोप पदाधिकाऱ्यांमार्फत पाठवला.
दरम्यान, बैठक सुरू न झाल्याने राज ठाकरे संतापले. ‘बैठक वेळेत सुरू करायची नव्हती तर, मला इथे कशाला बोलावले ?’ असा जाब पदाधिकाऱ्यांना विचारत ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ते थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रवक्त्याकडून खंडन
राज ठाकरे नाराज होऊन गेले नाहीत, असा दावा पक्ष प्रवक्ते योगेश खैरे यांनी केला. ते म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांनी काही संघटकांशी चर्चा सुरू केली होती, पण त्यांना अपेक्षित माहिती मिळत नव्हती. त्यामुळे आणखी तयारी करून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करा, मी नंतर बैठक घेतो असे सांगून ते कार्यालयातून बाहेर पडले. ते गेल्यानंतर आम्ही मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.