पोकरा प्रकल्पाच्या
योजनांचा लाभ घ्या
अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, हवामान बदलास अनुकूल शेती पद्धतींचा प्रसार आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रकल्पांतर्गत वानिकी व बांबू लागवड, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण, फळबाग, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, शेडनेट व हरितगृह लागवड साहित्य आदी घटकांसाठी अनुदान उपलब्ध आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट अनुदान जमा केले जात असल्याने प्रक्रिया पारदर्शक व जलद झाली आहे. मात्र अकोला जिल्ह्यात ठिबक व तुषार सिंचन वगळता इतर योजनांसाठी अपेक्षित अर्ज प्राप्त झालेले नाहीत. अधिक माहितीसाठी कृषिताई, समूह सहायक किंवा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.
अण्णाभाऊ साठे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा
अकोला : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. २४) अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. २०२५ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमांत किमान ६० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अर्जासोबत जातीचा, उत्पन्नाचा दाखला, आधार, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र व छायाचित्र जोडणे आवश्यक असून अर्ज जिल्हा कार्यालय, अकोला येथे सादर करावेत.
विद्यार्थिनींकडून लसीकरण
शिबिराचे आयोजन
रिसोड, जि. वाशीम : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित रिसोडच्या कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत सवड येथे पशू लसीकरण शिबिराचे आयोजन केले. शिबिरात सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनील अहिरे यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. गाई, म्हशी व शेळ्यांसह सुमारे १०० पशुधनाचे विविध आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कृषी विज्ञान केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी शेतीमध्ये पशुधनाचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्य जपण्याची गरज अधोरेखित केली. प्राचार्य डॉ. आशिष अप्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. कृष्णा देशमुख यांनी शिबिराचे समन्वयक केले. विद्यार्थिनी हिमांशी कांचनपुरे, सलोनी माळेकर, निकिता पातुरकर, अश्विनी गवई, अक्षदा झंजाड व संजना साखरकर यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.