तिसऱ्या यादीत ११ हजार ८९५ शेतकरी
अकोला जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत ४८ हजार ९७९ शेतकरी पात्र
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तिसऱ्या यादीत अकोला जिल्ह्यातील ११ हजार ८९५ शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार ९७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत ३१० कोटी १० लाख रुपये जमा झाले असून, तिसऱ्या यादीतील लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
योजनेसाठी पात्र ठरलेल्या ८५ हजार ६८१ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी अद्याप ३६ हजार ७०२ शेतकऱ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत आलेली नाहीत. सध्या दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून २०२६ मध्ये कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने ‘मित्र’ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर २०२५ मध्ये समिती स्थापन केली. शेती कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. दोन जून रोजी राज्य मंत्रिमंडळाने योजनेला मंजुरी दिली आणि शासन आदेश जारी करण्यात आला.
पहिल्या दोन टप्प्यांत ३१० कोटी जमा
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १९ हजार १९० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांत १६९ कोटी ३६ लाख रुपये जमा झाले. दुसऱ्या टप्प्यात १७ हजार १७४ शेतकऱ्यांच्या खात्यांत १४० कोटी ८२ लाख रुपये वर्ग करण्यात आले. आता तिसरी यादी जाहीर झाल्याने कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे.
आधार प्रमाणीकरण तातडीने करा ः साबळे
शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. आता यानंतर ओटीसअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार आहे. कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार असल्यामुळे यादीतील पात्र शेतकऱ्यांनी विनाविलंब आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
- गितेशचंद्र साबळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला