पान ८ बॉटम
चीनमध्ये शेतीला
एल निनोचा फटका
…………
कापूस, मक्यासह धान्य उत्पादन घटीचा अंदाज
…………
बीजिंगः चीनमधील मका, कापूस, तांदूळ आणि सोयाबीन पिकाला कमी पाऊस तसेच वाढलेल्या उष्णतेचा फटका बसत आहे. पुढील काळात तापमानात आणखी वाढ होऊन अतिवृष्टी, पूर अशीही संकटे येऊ शकतात, असा अंदाज चीनच्या हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे चीनमधील उत्पादनाकडे जागतिक बाजाराचे लक्ष आहे.
जागतिक पातळीवर एल निनोची चर्चा सुरु असतानाच चीनमध्ये चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. चीनमधील महत्त्वाच्या उत्पादक पट्ट्यात पिके संकटात आली आहेत. चीन हवामान विभागाच्या मते, सध्या देशातील पिके बहुतांशी भागात फुलोरा आणि दाणे भरण्याच्या स्थितीत आहेत. या टप्प्यातील पिकांवर हवामान बदलाचा आणि त्यातही उष्णतेचा लगेच परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन आणि पीक व्यवस्थापनाच्या पारंपरिक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे वृत्त चीनमधील वृत्तपत्रांनी दिले आहे.
महत्त्वाच्या शेतीपट्ट्यात कमी पाऊस आणि अतिउष्णता असल्याने चिंता वाढली आहे. ऐन पीक वाढीच्या काळात ही परिस्थिती निर्माण झाल्याने मका, सोयाबीन, तांदूळ आणि कापसाचे उत्पादन कमी होऊ शकते, अशी भीती चीनच्या प्रशासनाने व्यक्त केली आहे. चीनच्या अन्नधान्य उत्पादनासाठी महत्त्वाच्या उत्तर भागातही परिस्थिती बिकट आहे.
शांडाॅन्ग प्रांतात चीनचे १० टक्के मका उत्पादन होते. परंतु या भागात तापमानात पुढील काही दिवसांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. शिनजियांग उईघुर प्रांतातील काही भागात तापमान आधीच ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. या भागात कापूस पीक अडचणीत आले आहे. वाढलेल्या तापमानामुळे आर्द्रताही वाढली आणि कापूस पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. पिकांना फटका बसत असला तरी चीन सरकारकडून अद्याप नुकसानीचा आकडा पुढे आलेला नाही.
तज्ज्ञांच्या मते, वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा ही चीनच्या शेतीसमोरील दीर्घकालीन आव्हान बनत आहेत. सातत्याने दुष्काळ आणि टोकाचे तापमान यामुळे चीनला पिकांचे उष्णता सहनशील वाण संशोधन, सिंचनाच्या सुविधांचा विकास आणि हवामानाच्या संबंधित धोक्यांची माहिती देणाऱ्या प्रणालीचा विकास करण्यासाठी गुंतवणूक करावी लागत आहे.
संकट गहिरे होणार ः
चीनच्या शेतीसमोरील आव्हान आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीन हवामान विभागाच्या मते, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण केवळ तापमानच वाढणार नाही तर अतिवृष्टी, पूर आणि टायफून वादळे अशी संकटे येण्याची शक्यता आहे. दक्षिण चीनमध्ये आधीच अतितीव्र पाऊस झाल्याने भात पीक संकटात आले आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
जागतिक बाजाराचे लक्ष ः
चीन जागतिक पातळीवर धान्य आणि तेलबिया आयातीत आघाडीवर आहे. त्यामुळे चीनमधील उत्पादनात घट होते का? याकडे जागतिक बाजाराचे लक्ष आहे. चीनमधील धान्य आणि तेलबिया आणि कापूस पीक उत्पादनात घट झाल्यास चीन आयात वाढवेल आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतील, असे जाणकारांनी सांगितले.
००००००००००००००००००
शेतकऱ्यांच्या गरजेनुसार
तंत्रज्ञान निर्मिती हवी ः राय
………
मुंबई ः देशातील शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. फलोत्पादन शेतीत तंत्रज्ञान वापराला संधी आहेत. तंत्रज्ञान वापराने मजूर समस्येवर मात करता आली तसेच उत्पादकताही वाढत आहे. ट्रॅक्टर उद्योगाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित केल्यास मोठी संधी आहे, असे महिंद्रा ट्रॅक्टरचे कार्यकारी अधिकारी हर्ष राय म्हणाले.
नाशिक येथे नुकत्याच आयोजित केलेल्या ओजा ट्रॅक्टरच्या तिसऱ्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. श्री. राय पुढे म्हणाले की, शेतीचे भविष्य तंत्रज्ञान आणि विशेषीकरण आधारित उपायांमध्ये दडलेले आहे. यामुळे तंत्रज्ञान आणि विशेषीकरणामुळे उत्पादकता आणि परतावा वाढवण्यास मदत होईल, यावर आमचा विश्वास आहे. भारतातील फलोत्पादन आणि विशेषीकृत शेतीचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे विशिष्ट कामांसाठी तयार केलेल्या यांत्रिकीकरणाची गरज अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे. हीच गरज लक्षात घेऊन महिंद्राने ओजा मालिकेची निर्मिती केली. हा ट्रॅक्टर विकसित करताना अल्प भुधारिक, फळबाग धारक शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत. आधुनिक शेती आणि शेतीची बदलती गरज पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाची अभियांत्रिकी, नावीन्य आणि ग्राहकांच्या विशेष गरजा यांचा संगम ओजाने साधला आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विपणन तसेच राष्ट्रीय व्यवसाय कामकाज प्रमुख परीक्षित घोष म्हणाले, की ओजा ट्रॅ्रक्टरने फलोत्पादन, द्राक्षाच्या बागा, फळबागा, ऊस शेती, भात इतर पिकांमध्ये सर्व कामे करणे शक्य आहे. कांदा लागवडीसाठीही हे ट्रॅक्टर उपयुक्त ठरत आहे. ओजाच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि बहुपयोगी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. यात ३ ते ४ एचपीचे विविध पर्याय दिले गेले आहेत.
तीन प्रकारांत उपलब्ध ः
महिंद्राने प्रोजा अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पॉवर टेक-ऑफ, इलेक्ट्रॉनिक ड्राफ्ट ॲण्ड डेप्थ कंट्रोल,फॉरवर्ड-रिव्हर्स तसेच शटल आणि क्रीपर मोड्स यांसारखी उत्पादकता वाढवणारे तंत्रज्ञान आहे. मोजा अंतर्गत टेलिमॅटिक्सची सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. तर रोबोजा पॅकद्वारे ऑटो पीटीओ, ऑटो इम्प्लिमेंट लिफ्ट आणि ऑटो वन-साइड ब्रेकिंग यांसारखी ऐच्छिक ऑटोमेशन वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.