मंदाकिनी नदीच्या पुरामुळे चित्रकूट जलमय
शेकडो घरे पाण्याखाली, हजारो नागरिकांचे स्थलांतर
चित्रकूट, ता. ३० (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला असून, चित्रकूट जिल्ह्यासह उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकडो घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले असून, हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नदीची सध्याची पाणीपातळी पूररेषेपेक्षा सहा मीटर वर आहे, त्यामुळे चित्रकूट जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
चित्रकूटसह मध्य प्रदेशातील डोंगररांगांमध्ये झालेल्या पावसामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी वाढल्यामुळे रामघाट आणि निर्मोही आखाड्यासह अनेक सखल भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला असून, रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. पुराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, रामघाट परिसरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक मंदिरे आणि मठांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना घरातून बाहेर काढण्यासाठी नौकांचा वापर करावा लागत आहे, तर काही नागरिकांनी छतांचा आसरा घेतला आहे. रामघाट आणि हनुमानधारा यांना जोडणारा पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. तसेच दोन्ही राज्यांच्या सीमेवरील रामघाट भागाला सर्वांत जास्त फटका बसला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीच्या घाटांपासून दूर राहण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच, बलिया भागामध्ये त्यांनी हवाई पाहणीही केली. मदत व बचावकार्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सतना जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत, सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
चित्रकूट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून पूरस्थितीचा आढावा घेतला जात असून, पाण्याच्या प्रवाहावरही लक्ष ठेवण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके २४ तास कार्यरत असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने बचावकार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.