बेकायदेशीर रिक्षा वाहतुकीवर कारवाईची मागणी
अहिल्यानगर ः जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली, तसेच कार्याध्यक्ष विलास कराळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. शहरातील प्रायव्हेट, स्क्रॅप झालेल्या, तसेच बाहेरून शहरात आलेल्या रिक्षांकडून होणारी कथित बेकायदेशीर वाहतूक तातडीने बंद करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. आरटीओ कार्यालयात वाहनधारकांची होणारी कथित आर्थिक लूट थांबवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. याशिवाय दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक कायदा करावा, तसेच गंभीर स्वरूपाच्या भेसळ प्रकरणांत कठोर शिक्षा व मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद करावी, अशी मागणी संघटनेने केली.
--------
लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात
अहिल्यानगर ः महालक्ष्मी माता मित्र मंडळातर्फे आषाढी अमावस्यानिमित्त लालटाकी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. मंडळाचे अध्यक्ष साहेबराव काते यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांच्या गजरात पोतराज व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याचे हे २५ वे वर्ष असून या शोभायात्रेचा प्रारंभ लालटाकी भारस्कर कॉलनी येथून झाला. पारंपरिक वाद्यांचे गजर व लक्षीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला. सर्जेपुरा, दिल्लीगेट, न्यू आर्टस महाविद्यालय मार्गे लालटाकी येथील लक्ष्मीमाता मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेनंतर भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा भाविकांसह परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
------------
नशामुक्त शहरासाठी उर्दू शाळेची जनजागृती रॅली
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा पोलिस दल व जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘नशा मुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत अहमदनगर उर्दू प्रायमरी, उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. या रॅलीद्वारे नशामुक्तीचा संदेश देण्यात आला. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे विविध फलक हातात घेत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्यात आली. “नशा छोडो, भारत जोडो”, “नशा मिटाव, देश बचाव”, “भविष्य बनाव, सेहत का खयाल रखो” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी मंगलगेट, कोठला भागातून रॅली काढली. या घोषणांमुळे परिसर व्यसनमुक्तीच्या संदेशाने दुमदुमून गेला. पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी अहिल्यानगर जिल्हा व्यसनमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. समाजातील तरुण पिढीला अमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर ठेवण्याचा, तसेच निरोगी व सुदृढ समाज घडविण्याचा संकल्पही सर्वांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.