खतांवरील अनुदान बंद
करून पिकांना हमीभाव द्या
विजय जावंधिया यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी भाषणात खतांवरील अनुदानाचा उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर खतांवरील अनुदानाची पद्धत बदलून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना द्यावा आणि युरिया व डीएपीच्या प्रत्यक्ष किमतीच्या आधारे पिकांचा उत्पादन खर्च निश्चित करून हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.
जावंधिया यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकार सध्या युरियाची ४५ किलोची गोणी सुमारे ३०० रुपये, तर डीएपीची गोणी १,३५० रुपयांत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. या किमती आणि खतांच्या प्रत्यक्ष किमतीतील फरक अनुदानातून भरून काढला जातो. मात्र, अनुदानाच्या या व्यवस्थेमुळे शेतीमालाचा वास्तविक उत्पादन खर्च हमीभाव ठरविताना पुरेशा प्रमाणात प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे खतावरील अनुदान थेट शेतकऱ्यांना देऊन युरिया आणि डीएपीची किंमत बाजारातील प्रत्यक्ष खर्चानुसार निश्चित करावी. कृषी मूल्य व खर्च आयोगाने युरियाची सुमारे तीन हजार रुपये आणि डीएपीची पाच हजार रुपये प्रतिगोणी किंमत उत्पादन खर्चात गृहीत धरावी. त्यानुसार सर्व पिकांचा उत्पादन खर्च निश्चित करून त्यावर आधारित किमान आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. २०१९ पासून पीएम-किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत असले तरी त्यात वाढ झालेली नाही. दुसरीकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खत अनुदानाच्या सध्याच्या व्यवस्थेऐवजी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला थेट हातभार लागेल, अशी धोरणात्मक सुधारणा करण्याची गरज असल्याचे जावंधिया यांनी पत्रात नमूद केले आहे.
अन्न अनुदानात करावी लागेल वाढ
केंद्र सरकारने ३००० रुपयांत युरिया आणि ५००० रुपयांत डीएपी उपलब्ध करून दिल्यास त्यानुसार हमीभाव जाहीर करावे लागतील. सध्या धानाकरिता २३६९ तर गव्हासाठी २५८५ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. त्यातही वाढ करावी लागेल. त्याचा परिणाम पाच किलो मोफत धान्य योजनेवरही होणार आहे. सध्या या योजनेसाठी अर्थसंकल्पात २ लाख ३० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वाढ करून ती चार लाखांपर्यंत करावी लागेल. मात्र हे करावे लागू नये याकरिताच खतावर अनुदान देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. याद्वारे शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा डाव साधला जातो, असा टोलाही जावंधिया यांनी लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.