SHR26B12380
श्रीरामपूर ः सराला बेट येथे दुर्गाष्टमीला पूजा करताना महंत रामगिरी महाराज. समवेत हरिशरणगिरी महाराज, विश्वनाथगिरी महाराज, अर्जुनगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, रामभाऊ महाराज, साई महाराज, विक्रम महाराज, मधुकर महाराज आदी.
आध्यात्मिक प्रगतीसाठी नामस्मरण श्रेष्ठ
सराला बेटावर दुर्गाष्टमीनिमित्त होमहवन; हजारो भाविकांना गुरुमंत्राची दीक्षा
श्रीरामपूर, ता. १९ : दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करताना माणसाला मानसिक आधाराची गरज असते. अशावेळी परमेश्वराचे नामस्मरण मनाला बळ देते. नामस्मरण ही केवळ वृद्धांनी किंवा निवृत्त व्यक्तींनी करण्याची गोष्ट नसून, आध्यात्मिक प्रगतीचा तो प्रभावी मार्ग आहे. यातून मिळणारा आनंद आणि मानसिक बळ कठीण प्रसंगांतही आधार देतात, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सराला बेट येथे दुर्गाष्टमीनिमित्त सोमवारी (ता. १९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. योगीराज गंगागिरी महाराज आणि ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने येथे दुर्गाष्टमीला होमहवन आणि गुरुमंत्रदीक्षा दिली जाते. यानिमित्त आयोजित यज्ञाची पूर्णाहुती झाल्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी भाविकांना नामस्मरणाच्या गुरुमंत्राची दीक्षा दिली.
महंत रामगिरी महाराज म्हणाले, अडचणीत सापडल्यानंतर प्रत्येकाला देवाची आठवण होते. आपले कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, मात्र परमेश्वराच्या स्मरणातून आध्यात्मिक संपत्तीही जमा होत असते, याचा विचार केला पाहिजे. आपल्या आराध्य दैवताचे गुणगान, स्मरण आणि चिंतन ही ध्यानधारणाच आहे. नामस्मरणामुळे मनाला स्थैर्य मिळते, इच्छाशक्तीला योग्य दिशा मिळते आणि कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ प्राप्त होते.
याप्रसंगी आमदार रमेश बोरणारे, देवळाली प्रवरा पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे सदिपान महाराज, विश्वनाथगिरी महाराज, अर्जुनगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, रामभाऊ महाराज, साई महाराज, विक्रम महाराज, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते.
-----
आळंदीतील बांधकामासाठी ४५ लाखांचा धनादेश
धनगरवाडी (ता. राहाता) आणि परिसरातील ग्रामस्थांतर्फे सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहातून शिल्लक राहिलेल्या ४५ लाख रुपयांचा धनादेश आळंदी येथील बांधकामासाठी महंत रामगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.