शिंदे येथे शेतकऱ्याचा
सर्पदंशाने मृत्यू
सोग्रस, जि. नाशिक : चांदवड तालुक्यातील शिंदे येथील शेतकरी पंढरीनाथ बळवंत शिंदे (वय ६०) यांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या शेताच्या बांधावरून जात असताना त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ विषारी सापाने दंश केला. ही बाब तेथील सुरेश शिंदे, शंकर शिंदे व संतोष शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांना तातडीने वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना भोये यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जमिनीच्या वादातून
एकावर हल्ला
सिन्नर, जि. नाशिक : तालुक्यातील सोनगिरी येथे जमिनीच्या वादातून एकाच्या तोंडावर गरम चहा व मिरचीची पूड फेकून मारहाण करण्यात आली आहे. या बाबत एमआयडीसी पोलिसांनी आठ संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ निवृत्ती बोडके यांनी शिवाजी पोपट लहाने यांना शेतात लावलेले गिन्नी गवत काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने दमबाजी केली. दुसऱ्या दिवशी बोडके फवारणी करण्यासाठी गेले असता सतीश लहाने याने गजाने मारहाण केली. तर परशराम शिवाजी लहाने यांनी बोडके यांच्या तोंडावर मिरचीची पूड फेकली. याच वेळी शिवाजी लहाने यांनी गरम चहा तोंडावर फेकला. घटनेबाबत पोलिस ठाण्याकडे तक्रार करण्यासाठी येताना दुचाकी ढकलून दिली.
वणीत २२ जुलैला
समाधान शिबिर
वणी, जि. नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे बुधवारी (ता. २२) चोपडा लॉन्सवर आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात किमान ५ हजार लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी दिली. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या महाशिबिराच्या पूर्वतयारीसाठी पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक दिंडोरी प्रांत कार्यालयात झाली. या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पेठ व दिंडोरीचे तहसीलदार आणि निवासी नायब तहसीलदार हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. महाशिबिराचा लाभ घेण्यासाठी २२ जुलैला चोपडा लॉन्सवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.