कर्जमुक्तीच्या चौथ्या यादीत
चार हजार १६१ शेतकरी पात्र
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २ हजार ७३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील चार हजार १६१ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी गुरुवारी (ता. २२) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख २ हजार ७३ पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण दोन लाख २४ हजार ८४७ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर यापूर्वी २४ जुलै, ११ सप्टेंबर आणि १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आता चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. चौथ्या यादीतील पात्र चार हजार १६१ शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. या यादीतील काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक बँकांकडून पीक कर्ज घेतलेले आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची गणना ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही कर्ज खात्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार ही कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी मयत झालेले, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी ता. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.
----
आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली यादीतील नोंद तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.
- शाहुराज हिरे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नांदेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.