पुणे

‘ब्रिक्स’ देशांचा होणार सांस्कृतिक मिलाफ

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १७ : भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स सहकार्याला सांस्कृतिक आणि नागरी वारशाची जोड देण्यासाठी ‘एपी ग्लोबाले’ समूहातर्फे ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम-२ : सिव्हिलायझेशनल लेगसी’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत पाच आणि सहा सप्टेंबरला ताजमहाल पॅलेस येथे हा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील राजनैतिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रांतील मान्यवर या वेळी एकत्र येणार आहेत. ‘एपी ग्लोबाले’च्या संचालक जान्हवी पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या निमित्ताने ब्रिक्स देशांमध्ये सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याचा हा ‘एपी ग्लोबाले’ समूहाचा प्रयत्न आहे.
‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’ (जीआयएफ) संदर्भात आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जान्हवी पवार यांनी ‘जीआयएफ’द्वारे संस्कृती, वारसा, नवकल्पना आणि व्यवसाय यांचा संगम घडवून दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्याचा ‘एपी ग्लोबाले’ समूहाचा उद्देश अधोरेखित केला. त्या म्हणाल्या की, मुंबई ही भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असल्याने या फोरमसाठी हे योग्य ठिकाण आहे. भारतातील विविध राज्यांतील संस्कृतींचे प्रतिनिधित्व करण्याबरोबरच ब्रिक्स देशांतील सांस्कृतिक विविधता, क्रीडा, सर्जनशीलता आणि व्यावसायिक संधी एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, ‘ब्रिक्स युथ अलायन्स’चे संस्थापक संचालक मधिश पारिख यांनी युवकांना ब्रिक्स सहकार्याच्या केंद्रस्थानी आणण्याची गरज व्यक्त केली. व्हेंचर कॅटॅलिस्ट प्रज्ञान चौरसिया यांनी स्टार्टअप, गुंतवणूकदार आणि उद्योगविश्वातील प्रतिनिधींना एकत्र आणून भांडवल, बाजारपेठ विस्तार, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि सीमापार सहकार्याच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला. रशियन वकिलातीच्या द्वितिय सचिव मारिया कुद्र्याशोवा यांनी भारत-रशिया संबंधांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित केले. सांस्कृतिक संवादासोबत व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या संधी जोडल्यास भारत, रशिया आणि अन्य ब्रिक्स देशांमधील सहकार्याला नवी दिशा मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.

ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे स्वरूप
भारतामध्ये प्रथमच होणाऱ्या या फोरममध्ये दररोज सुमारे ५०० निमंत्रित प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री, राजदूत, मुत्सद्दी, उद्योगपती, गुंतवणूकदार, उद्योजक, अभ्यासक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच कॉर्पोरेट प्रतिनिधी यांचा त्यात समावेश असेल. राजकारण आणि अर्थकारणाच्या पलीकडे जाऊन संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि नागरी वारशाच्या माध्यमातून देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर या फोरमचा भर राहणार आहे. ‘सॉफ्ट पॉवर फेस्टिव्हल’ म्हणून या कार्यक्रमाची संकल्पना करण्यात आली आहे. आयुर्वेद आणि पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्र, कलरीपयट्टू आणि कुंग फू-ताई ची, शास्त्रीय नृत्य आणि कॅपोएरा, टागोर आणि टॉलस्टॉय यांच्या साहित्यापासून चित्रपट, संगीत, क्रीडा आणि आदिवासी परंपरांपर्यंत विविध सांस्कृतिक पैलूंवर चर्चा होणार आहे. पॅनेल चर्चा, परिसंवाद, विशेष संवाद आणि अनुभवाधारित कार्यशाळांचा कार्यक्रमात समावेश आहे. पहिल्या दिवसाची सांगता ‘गाला नाइट’ने होणार असून कॅपोएरा आणि तालवाद्यांचे विशेष सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी ‘फाउंडर्स नाइट’मध्ये स्टार्टअप संस्थापक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि फॅमिली ऑफिसचे प्रतिनिधी सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सहकार्याच्या संधी निर्माण करण्यासाठी निमंत्रितांसाठी स्वतंत्र नेटवर्किंग सत्रही आयोजित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोर्टाचा FDAला दणका! पुण्यातील दुकानदाराला ५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?

World Padel League चे गेम चेंजर्स लायन्स ठरले पहिले चॅम्पियन! ऑसी मॅव्हरिक जॅग्वार्सचा फायनलमध्ये पराभव

Digras News : उबाठाकडून खासदार संजय देशमुखांना घरपोच नोटीस

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या निविदेत प्रशासन एक पाऊल मागे

Pune News : आमदार सुनील कांबळे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT