तनघरापासून कृषी साम्राज्यापर्यंत..!
माणच्या माळावर नंदनवन
फुलवणारे गोपीनाथ काळेल
ऊसतोड कामगाराचा मुलगा, राहण्यासाठी दगडांच्या भिंतीवर गव्हाचे काड आणि वासे टाकून केलेले साधे ‘तनघर.’ घरची अवघी दोन-अडीच एकर तुकड्या-तुकड्यांची खडकाळ जमीन आणि हातात कोणतेही मोठे भांडवल नाही... अशा परिस्थितीतून प्रवास सुरू करून आज स्वतःची ३५ एकर बागायती जमीन, कोट्यवधींची उलाढाल, दिमतीला आलिशान गाड्या आणि दररोज ७० ते ८० महिलांच्या हाताला रोजगार देणाऱ्या वळई (ता. माण) येथील गोपीनाथ नारायण काळेल यांची ही संघर्षगाथा म्हणजे प्रत्येक भूमिपुत्राला नवी ऊर्जाच.
...........................
‘‘तुम्ही आज माझ्याकडून तुमचं रान काढून घेताय बरं का; पण लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की तुम्हाला मला भेटण्यासाठी वेटिंग करावं लागेल!’’ भर उन्हात स्वतःच्या हक्काची खतं दुसऱ्याच्या रानातून उचलून नेताना अपमानास्पद अवस्थेत एका तरुण शेतकऱ्याच्या तोंडून बाहेर पडलेले हे जळजळीत शब्द; पण ते शब्द आज सत्य ठरले आहेत. ज्या मालकाने त्या दिवशी रान काढून घेतले होते, तोच माणूस आज परदेशातून फोन करून विचारतो, ‘‘गोपा, तुला दहा मिनिटं वेळ आहे का रे? तुझ्याशी जरा बोलायचंय!’’
हा केवळ एका अपमानाचा घेतलेला सूड नाही, तर माण तालुक्यासारख्या कायम दुष्काळी पट्ट्यात जिद्द, अचूक तंत्रज्ञान आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर शून्यातून उभ्या केलेल्या एका कृषी साम्राज्याचा हा जिवंत दस्तऐवज आहे.
कोयता ते असेंब्ली लाइन
माण तालुका म्हटलं, की डोळ्यासमोर येतो तो उजाड माळरान, पाण्यासाठीची वणवण आणि पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे स्थलांतर. याच मातीत या शेतकऱ्याचे बालपण गेले. आई- वडील दुसऱ्याच्या फडात ऊस तोडायचे. घराची परिस्थिती इतकी हलाखीची, की डोक्यावर पक्के छप्परही नव्हते. ‘तनघरा’त अख्खे कुटुंब राहायचे. पावसाळ्यात पाणी गळू नये म्हणून दरवर्षी त्या घरावरचा कागद बदलावा लागायचा.
अशा परिस्थितीत दहावी- बारावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. काहीतरी तांत्रिक कौशल्य हातात असावे म्हणून त्यांनी कऱ्हाड गाठले आणि आयटीआयमध्ये फिटर ट्रेडला प्रवेश घेतला. तेथेच अप्रेंटिसशिप पूर्ण केली आणि २००३- ०४ च्या सुमारास पुण्यात टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळाली. नोकरी तात्पुरत्या स्वरूपाची (टेम्पररी) होती. सहा महिने काम आणि सहा महिने घरी बसायचे. त्या काळी १५ ते २० हजार रुपये पगार मिळायचा. २००३ मध्ये पंधरा हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती.
मुलाच्या हातात चार पैसे खेळू लागताच त्यांनी पहिली गोष्ट कोणती केली असेल, तर आई-वडिलांच्या हातातला ऊसतोडणीचा कोयता खाली ठेवायला लावला. सहा महिन्यांच्या पहिल्या पिरियडमधून आलेल्या पैशातून त्यांनी गावाकडच्या थोड्याशा जमिनीत एक बोअरवेल घेतली आणि डाळिंबाची बाग लावली. त्या डाळिंबाच्या बागेने कमाल केली. सलग दोन- तीन वर्षे एका एकरातून पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि खऱ्या अर्थाने शेतीतील अर्थकारणाची पहिली चव त्यांना चाखायला मिळाली.
६१ सेकंदांचे यांत्रिक आयुष्य
एकीकडे पुण्यातली नोकरी आणि दुसरीकडे गावाकडची शेती असा दुहेरी प्रवास सुरू होता; पण पुण्यातल्या त्या यांत्रिक आयुष्याची त्यांना अक्षरशः धास्ती वाटू लागली होती. पहाटे चार वाजता उठायचे, डोळे चोळत कंपनीची बस पकडायची आणि दिवसभर घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या सिस्टिममध्ये स्वतःला झोकून द्यायचे. त्यांचे काम होते इंडिका गाडीच्या असेंब्ली लाइनवर. हातात वेळ असायचा फक्त ६१ सेकंद! या ६१ सेकंदांत गाडीला व्हायपर मोटर बसवायची म्हणजे बसवायचीच. एक सेकंद जरी इकडे- तिकडे झाला तरी अख्खी लाइन थांबणार. या ‘सायकल टाईम’च्या प्रचंड तणावाखाली आणि सेकंदा- सेकंदाच्या हिशोबावर चालणाऱ्या आयुष्याला ते कंटाळले.
‘‘मला अजूनही पुण्याचा तो काळ आठवला की भीती वाटते, मी त्या वातावरणाने अक्षरशः घाबरलो होतो,’’ असे ते प्रांजळपणे सांगतात. अखेर २००७ मध्ये त्यांनी या घड्याळाच्या गुलामगिरीला कायमचा रामराम ठोकला आणि पूर्णवेळ काळ्या आईची सेवा करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.
प्रयोगशील शेतीची
शून्यातून मुहूर्तमेढ
२००७ मध्ये नोकरी सोडली तेव्हा हातात शेतीचे सखोल ज्ञान नव्हते; पण काहीतरी वेगळे आणि आधुनिक असे करण्याची प्रचंड उर्मी होती. त्या काळी या भागात कोणीही ढोबळी मिरची (शिमला मिरची) किंवा टोमॅटो करत नव्हते. त्यांनी तोच जुगार खेळायचे ठरवले. ढोबळी मिरचीची लागवड केली आणि पहिल्याच फटक्यात सात- आठ लाख रुपयांचे उत्पन्न हातात आले.
विशेष म्हणजे, त्यांचा हा दर्जेदार माल थेट ‘रिलायन्स’ मॉलला जात होता. कॉर्पोरेट क्षेत्राला माल पुरवण्याची सवय येथूनच लागली. भागात शिमला मिरची आणि टोमॅटोची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. त्या वेळी शेतीचे परिपूर्ण ज्ञान नव्हते; पण कल पूर्णपणे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे होता. बाजारातून कोणतेही औषध किंवा खत आणले, तर त्यावरची लेबलं वाचायची, त्यातील मूळ रासायनिक घटक (कंटेंट) काय आहे, हे तपासायचे आणि ते पिकावर नेमके कसे काम करते, याचा अभ्यास करायचा, ही सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली.
दुसऱ्याच्या माळरानावर फुलवलेले नंदनवन आणि तो जळजळीत अपमान
स्वतःची जमीन म्हणायला गेलं तर वडिलोपार्जित अवघी दोन-चार एकर; तीही भावकीच्या वाटण्यांमुळे छोट्या-छोट्या पट्ट्यांत विभागलेली आणि प्रचंड खडकाळ (हार्ड रान). त्यात माण तालुक्याचा पाचवीला पुजलेला दुष्काळ. अशा तुकड्यांत मोठी शेती करणे अशक्य होते. मग त्यांनी एक धाडसी मार्ग निवडला. दुसऱ्यांची पडीक माळराने भाडेतत्त्वावर (खंडाने) घ्यायची!
लोकांची उजाड, दगड-धोंड्यांची राने दोन- तीन वर्षांसाठी कराराने घ्यायची, स्वतःचा पैसा ओतून ती जमीन दुरुस्त करायची, नांगरायची, तिथे पाण्याची सोय करायची आणि त्यातून सोनं पिकवायचं, हा त्यांचा पॅटर्न बनला.
दुसऱ्यांच्या रानांनीही मला खूप साथ दिली, त्या रानांना मी कधीच नावं ठेवू शकत नाही. त्यांच्यामुळेच मी आज या पायरीवर पोहोचलोय, अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात; पण सगळेच जमीन मालक चांगले भेटले नाहीत. रानात हिरवेगार पीक डोलू लागले आणि लाखोंचा पैसा दिसू लागला की एखाद्या जमीन मालकाची नियत फिरायची.
स्वाभिमानाची ठिणगी
असाच एक काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. एका मालकाने मुदतीआधीच जमीन परत मागितली. नुसती जमीनच घेतली नाही, तर रानात टाकलेली खतांची पोती आणि सामानही उचलून न्यायला लावले. एका शेतकऱ्यासाठी आपल्याच घामाने भिजवलेल्या मातीतून असे अपमानित होऊन बाहेर पडणे यासारखे दुसरे दुःख नसते. त्या दिवशी त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला; पण खचून जातील ते गोपीनाथ कसले! रानातून खतांची पोती उचलताना त्यांनी त्या मालकाच्या डोळ्याला डोळा भिडवून सांगितले होते, ‘‘आज तुम्ही माझ्याकडून रान काढून घेताय; पण एक दिवस तुम्हाला माझ्या भेटीसाठी वेटिंग करावं लागेल!’’
या एका अपमानाने त्यांच्यातील स्वाभिमानाची ठिणगी पेटली. ते म्हणतात, ‘‘ते झालं एका अर्थी चांगल्यासाठीच झालं! जर त्या मालकाने रान काढून घेतलं नसतं, तर मी त्याच एक-दोन एकरांत आयुष्यभर गुरफटून राहिलो असतो. माझी जी मोठी झेप होती, ती मी कधीच घेऊ शकलो नसतो.’’
गटशेती ते ५० लाखांचा फटका
या घटनेनंतर त्यांनी आपल्या कामाचा परीघ विस्तारला. माण तालुक्याची सीमा ओलांडून त्यांनी सांगोला तालुक्यात (लक्ष्मीनगर) पाऊल ठेवले. तिथे धनंजय बाड या दिलदार मित्राची साथ मिळाली. दोघांचे विचार आणि शेतीची आधुनिक टेक्नॉलॉजी जुळली. त्यांनी एकत्र येऊन तब्बल २० एकरांचे भव्य प्लॅनिंग केले. एकाच वेळी १० एकर मिरची, सहा एकर झेंडू आणि सहा एकर टोमॅटो! या भागीदारीच्या शेतीने छप्परफाड नफा मिळवून दिला. त्या वर्षी त्यांच्या वाट्याला २० ते २५ लाख रुपयांचा निव्वळ नफा आला.
पुढे त्यांनी पुन्हा माण तालुक्यात मोर्चा वळवला. सिद्धेश्वर काळेल वकिलांचे आठ- नऊ एकर क्षेत्र भाड्याने घेतले. तिथे स्वतः खर्च करून पाइपलाइन टाकली, रान तयार केले. याच काळात त्यांनी पूर्णपणे ‘सेंद्रिय शेती’ (ऑरगॅनिक फार्मिंग) करण्याचा एक मोठा प्रयोग हाती घेतला. कोणताही मध्यस्थ न ठेवता विषमुक्त भाजीपाला थेट ग्राहकांना विकायचा, असे नियोजन होते;
पण नियतीच्या मनात वेगळेच होते. देशात कोरोनाचे महासंकट धडकले. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग ठप्प झाले. बाजारपेठा बंद झाल्या, वाहतूक थांबली आणि सेंद्रिय शेतीचा तो भव्य प्रकल्प पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. त्या एका वर्षात त्यांना तब्बल ४० ते ५० लाख रुपयांचा प्रचंड तोटा सहन करावा लागला. सामान्य माणूस अशा घावाने पुन्हा उभाच राहू शकला नसता; पण दहा वर्षांच्या अनुभवाने त्यांची मानसिकता पोलादी बनवली होती.
‘टोमॅटोचा जॅकपॉट’
अन् ‘मिरची क्रांती’
कोरोनाचा फटका पचवून ते २०२० मध्ये पुन्हा मैदानात उतरले. त्याच रानात त्यांनी सहा- सात एकरांवर टोमॅटोची लागवड केली. निसर्गाने साथ दिली. त्यांचे अचूक तंत्रज्ञान फळाला आले आणि बाजारात दरही चांगला सापडला. त्या सहा एकर टोमॅटोने त्यांना एकाच हंगामात तब्बल ८० लाख रुपये मिळवून दिले.
हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. या ८० लाखांतून त्यांनी जी घट्ट पकड (ग्रीप) घेतली, ती आजतागायत सोडलेली नाही. दुसऱ्याच्या रानात खत उचलण्याच्या अपमानाची जखम अजून ताजी होतीच. त्यांनी या पैशातून सर्वप्रथम पानवनमध्ये (गट नं. ४५४) स्वतःच्या मालकीची आठ एकर जमीन रोख खरेदी केली! भाडेतत्त्वावरील शेतकरी आता खऱ्या अर्थाने ‘जमीनदार’ बनला होता.
पुढे एक- दोन वर्षे चढ- उतारांची गेली; पण २०२३ हे वर्ष त्यांच्या आयुष्यात अक्षरशः सोन्याचा धूर घेऊन आले. त्यांनी दिलीप साहेबांच्या रानात आणि पात्राच्या जमिनीत मिळून १५ एकरांवर मिरचीची लागवड केली. २००७ पासून २०१९ पर्यंतच्या १२ वर्षांच्या तपश्चर्येतून त्यांना बाजाराच्या सायकलचे अचूक गणित कळले होते. पूर्वी ते जूनमध्ये मिरची लावायचे, तेव्हा बाजारात आवक वाढून दर कोसळायचे; पण अनुभवातून त्यांनी ‘कोणत्या सिझनला कोणता बॉल टाकला तर थेट षटकार बसतो’ याचे तंत्र आत्मसात केले होते.
२०२३ मध्ये त्यांच्या मिरचीला प्रतिकिलो तब्बल १०० रुपये असा ऐतिहासिक दर मिळाला. या एकाच हंगामात १५ एकर मिरचीतून त्यांनी तीन ते चार कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली.
सहा वर्षांत उभारले
३५ एकरांचे साम्राज्य
२०२० ते २०२६ या अवघ्या पाच-सहा वर्षांच्या काळात या शेतकऱ्याने केलेली प्रगती डोळे दिपावणारी आहे. एकेकाळी दोन एकर खडकाळ जमिनीवर जगणाऱ्या या माणसाने गेल्या सहा वर्षांत तब्बल ३० ते ३५ एकर बागायती जमीन स्वतःच्या हिमतीवर खरेदी केली आहे. यामध्ये बाबा सावकारांचे ११ एकर, पात्राचे दोन एकर आणि नुकतेच दस्त केलेले १० एकर अशा सलग आणि सुपीक जमिनींचा समावेश आहे. केवळ जमिनीच घेतल्या नाहीत, तर आयुष्याची सर्व स्वप्ने रोख पैशांच्या जोरावर पूर्ण केली.
गावात टुमदार बंगला
पुण्यात स्वतःचा फ्लॅट घेतला आणि हडपसरमध्ये मोक्याची जागा खरेदी केली.
घरासमोर अल्काझार, बोलेरो, पिकअप अशा मोटारी आणि पाच- सहा दुचाकी उभ्या केल्या. विशेष म्हणजे, यातील एकाही वाहनावर एक रुपयाचेही कर्ज नाही; सर्व खरेदी १०० टक्के रोखीने! घरात आर्थिक सुरक्षितता निर्माण केली.
आजच्या घडीला त्यांच्याकडे स्वतःचे आणि करारावर घेतलेले मिळून एकूण ४० एकरांहून अधिक बागायती क्षेत्र (डाळिंब, पेरू, टोमॅटो आणि मिरची) व्यवस्थापनाखाली आहे. या हंगामातही त्यांच्याकडे २५ एकरांवर टोमॅटो आणि मिरची डोलत असून, किलोला सरासरी ४० ते ५० रुपयांचा जरी दर मिळाला, तरी दोन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न सहज हाती येईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
अॅग्रीच्या तज्ज्ञांनाही
शिकवण्याची ताकद
आजकाल शेतीत थोडेसे यश मिळाले की रील्स बनवणे, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणे आणि सोशल मीडियावर मिरवणे हा ट्रेंड बनला आहे; पण हा माणूस या सगळ्या झगमगाटापासून कोसो दूर आहे. ‘‘आम्ही कधीही इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत नाही की आमचा व्हॉट्सअॅपला स्टेटस दिसणार नाही. मीडियाची आम्हाला अजिबात आवड नाही,’’ असे ते स्पष्टपणे सांगतात. त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ आपल्या पिकाच्या मुळावर आणि पानावर असते.
वीस वर्षांच्या अनुभवातून त्यांनी पिकांचे मानसशास्त्र आणि रोगनिदान इतके अचूक आत्मसात केले आहे की, मोठ्या खत आणि बियाणे कंपन्यांचे ‘बीएससी अॅग्री’ झालेले प्रतिनिधी त्यांच्या बांधावर तासन्तास वेटिंगवर बसलेले असतात.
टोमॅटोवरील ‘अर्ली ब्लाईट’, ‘लेट ब्लाईट’, ‘बॅक्टेरियल ब्लाईट’ (करपा) असो वा ‘ट्युटा अॅबसोल्युटा’ (नागअळी) आणि मिरचीवरील ‘थ्रिप्स’चे संकट असो; या रोगांवर कसा आळा घालायचा याची त्यांची स्वतःची एक ‘सिस्टिम’ आहे. अळीची अंडी केव्हा मारायची आणि मोठ्या अवस्थेतील कीड कशी नियंत्रणात आणायची, याचे त्यांचे स्वतःचे वेळापत्रक असते. आज पंचक्रोशीतील कोणत्याही कृषी सेवा केंद्रात फक्त त्यांचे नाव जरी घेतले, तरी दुकानदार वीस वेळा विचार करतो की यांना कोणता दर लावायचा आणि औषध ओरिजिनल आहे का नाही! ही पत त्यांनी आपल्या कामातून आणि व्यवहारातून कमावली आहे.
गावोगावचे ‘कृषी विद्यापीठ’
आणि ८० महिलांचा अन्नदाता
गोपीनाथ काळेल यांनी आपले ज्ञान कधीही स्वतःपुरते मर्यादित ठेवले नाही. झांबरेणी, पानवण, आटपाडकर वस्ती अशा आजूबाजूच्या गावांतील शेकडो तरुण शेतकऱ्यांना त्यांनी हाताला धरून आधुनिक शेतीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिसरात शेकडो यशस्वी शेतकरी तयार झाले आहेत. प्रसिद्ध वकील मंडळीही आज त्यांच्या सल्ल्याशिवाय शेतीत पाऊल टाकत नाहीत. त्यांच्या या कृषी साम्राज्याचे सर्वात मोठे सामाजिक योगदान म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना दिलेला शाश्वत रोजगार! त्यांच्या शेतात दररोज पळशी, पानवण, विरळी, म्हसवड, सामानवाडी या गावांमधून ७० ते ८० महिला मजूर कामासाठी येतात.
खुरपणी, बांधणी आणि तोडणीसाठी दिवसाला ३०० रुपये, तर फवारणीच्या कामासाठी ३५० रुपये मजुरी दिली जाते. इतकेच नाही, तर या महिलांना येण्या-जाण्यासाठी स्वतःच्या खिशातून प्रत्येकी १०० रुपये वाहनभत्ता (गाडीभाडे) आणि कामावर चहा- पाण्याची सोय केली जाते. दुष्काळी भागात दररोज ८० कुटुंबांची चूल त्यांच्या या शेतीच्या माध्यमातून पेटते, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
तलवारीच्या टोकावरची शेती
कोट्यवधींचे उत्पन्न दिसत असले, तरी शेती हा अत्यंत संघर्षाचा आणि ‘तलवारीच्या टोकावर चालण्याचा’ व्यवसाय आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. एका बाजूला माण तालुक्यातील पाण्याचा संघर्ष, कॅनॉलच्या पाण्यासाठी आणि विजेसाठी करावी लागणारी लढाई, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचा लहरीपणा! त्यातच मिरचीच्या व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक हा एक मोठाच फटका असतो. दरवर्षी काही व्यापारी शेतकऱ्यांचे पाच- दहा लाख रुपये बुडवतातच. मात्र, या २०-२५ वर्षांच्या संघर्षात विटा येथील मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे मेहता शेठ हे एकमेव असे व्यापारी भेटले, ज्यांनी न मागता आजवर रुपया न् रुपया घरी आणून दिला, अशी आठवण ते आवर्जून सांगतात. आज त्यांची मिरची स्थानिक बाजारात नाही, तर थेट शेतातून गाड्या भरून कोलकाता, दिल्ली, नागपूर, रांची आणि सिलिगुडी यांसारख्या देशाच्या कानाकोपऱ्यातील बाजारपेठांमध्ये जाते.
प्रगल्भ अन् जमिनीवरचे विचार
आधुनिक काळातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या तंत्रज्ञानाबद्दल त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ आणि जमिनीवरचे आहेत. खिशात महागडा आयफोन असूनही मोबाईलमध्ये जास्त न रमणारा हा शेतकरी विचारतो, ‘एआय (AI) हे नक्कीच पुढचे तंत्रज्ञान आहे; पण जर मी एआयला विचारले की माझ्या पिकावर करपा आलाय, तर ते मला थेट औषध सांगेल; पण करपा येण्यामागे शंभर कारणे असतात! तुमच्या पिकाचे पान किती पातळ आहे? जमिनीत पांढरी मुळी किती चालतेय? पिकाला सिलिकॉन मिळाले आहे का? एखादा एम. डी. डॉक्टर जसा रोगाच्या मुळाशी जाऊन उपचार करतो, तसे पिकाच्या मुळाशी जाऊन निदान करावे लागते.’ तरीही, आपल्या २० वर्षांच्या अनुभवाला जर यापुढे एआयच्या ज्ञानाची जोड दिली, तर उत्पादनात नक्कीच क्रांती होऊ शकते, हा सकारात्मक दृष्टिकोनही ते स्वीकारतात.
प्रेरणादायी दीपस्तंभ!
पहाटे चार वाजता उठून टाटा मोटर्सच्या बससाठी धावणारा, ६१ सेकंदांच्या सायकल टाइममध्ये अडकलेला आणि गव्हाच्या काडाच्या तनघरात राहणारा एक तरुण जेव्हा स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, जिद्दीवर आणि अफाट कष्टावर विश्वास ठेवतो, तेव्हा काय घडू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा शेतकरी..!
शेतीत काहीच उरले नाही म्हणून हताश होणाऱ्या हजारो तरुणांसाठी हा प्रवास म्हणजे एक धगधगती मशाल आहे. मातीशी इमान राखले, विज्ञानाची कास धरली आणि अपमानाचे रूपांतर जिद्दीत केले, तर दुष्काळी माळरानावरही कोट्यवधींचे साम्राज्य उभे राहू शकते, हेच या यशोगाथेने सिद्ध करून दाखवले आहे..!
फोटो
Gopinath Kalel
या फोल्डरमध्ये आहेत.
-------------------
फॅमिली फोटो आवश्यक,
कामगारांचा ग्रुप फोटो घ्या ही विनंती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.