पुणे

विठ्ठल विषय

CD

PNE26W44618
संग्रहित छायाचित्र

हिप्परगा तलावात अडीचशे एकरवर तरंगणार सौरऊर्जा प्रकल्प

जलसंपदा विभागाचा इतिहासातील पहिलाच प्रयोग; सोलापूरला दरवर्षी एक कोटींच्या विजेचा लाभ, २५ वर्षांत २५ कोटींचे उत्पन्न

सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत आणि १५४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या एखरूख अर्थात हिप्परगा तलावाच्या पाण्यावर आता सौरऊर्जेची निर्मिती होणार आहे. तलावाच्या एकूण १ हजार ६२६ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी तब्बल १०२ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीचशे एकर क्षेत्र तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज असून, २५ वर्षांच्या कालावधीत हिप्परगा तलावाच्या या प्रकल्पातूनच सुमारे २५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

जलाशयाच्या पाण्याच्या पृष्ठभागाचा वापर करून सौरऊर्जा निर्मिती करण्याचा जलसंपदा विभागाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या संरचनेवर सौर पॅनल बसविण्यात येतील. प्रकल्पाच्या युनिटसाठी आवश्यक असलेली काही जमीनही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

२३ कंपन्यांचा प्रतिसाद

हिप्परगा तलावासह राज्यातील दहा धरणे व तलावांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांकडून स्वारस्य मागविले होते. त्याला देशभरातील २३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये टाटा पॉवर, केपीआय ग्रीन एनर्जी, रेज पॉवर इन्फ्रा, विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर, आदित्य बिर्ला रिन्यूवेबल्स आणि जॅक्सन ग्रीन यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. प्राप्त प्रस्तावांमधून आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर प्रस्तावाची निवड करून संबंधित कंपनीसोबत २५ वर्षांचा वीज खरेदी करार केला जाणार आहे.

१०२ हेक्टर पाण्यावर पॅनल

हिप्परगा तलावातील १०२ हेक्टर क्षेत्रावर सौर पॅनलची तरंगती संरचना उभारण्यात येणार आहे. उपलब्ध जलसाठ्याच्या तुलनेत तलावाच्या पृष्ठभागाचा हा अत्यल्प भाग असल्याने जलाशयाच्या मुख्य वापरावर परिणाम न करता अतिरिक्त ऊर्जा निर्मितीचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे जलसंपदा विभागाला नियमित महसुलाचा नवा स्रोत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

दहा जलाशयांवर प्रयोग

हिप्परगासह पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, पिंपळगाव जोगे व घोड, सातारा जिल्ह्यातील वीर, उरमोडी व कन्हेर तसेच सांगली जिल्ह्यातील संख, बसप्पावाडी आणि मोरणा (शिराळा) या दहा जलाशयांची तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. या दहा जलाशयांतील निवडक क्षेत्रावर प्रकल्प उभारून दरवर्षी सुमारे २ हजार ९०० किलोवॉट सौरऊर्जा निर्मितीचा प्राथमिक अंदाज आहे.

१५४ वर्षांच्या वारसा प्रकल्पावर नवा प्रयोग

१८७१ मध्ये ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या हिप्परगा तलावाला आंतरराष्ट्रीय सिंचन व निचरा आयोगाने जागतिक वारसा सिंचन प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. सिंचन, पाणीपुरवठा आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या ऐतिहासिक जलाशयाच्या पाण्यावर आता सौरऊर्जा निर्मितीचा प्रयोग होत असल्याने हिप्परगा प्रकल्पाला आधुनिक ऊर्जा निर्मितीचे नवे स्वरूप मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT