KEG26A02675
हिवरे बाजार ः मुंबादेवी मंदिरात गावाचा पाण्याचा ताळेबंद सादर करताना धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप व तहसीलदार मिलिंद कुलथे. समवेत प्रशासक चंद्रकांत खाडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, पद्मश्री पोपटराव पवार, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर आणि मोहटा देवस्थानचे विश्वस्त विक्रम वाडेकर.
................
पाण्याचा ताळेबंद करणारे देशातील पहिले गाव
नवनाथ जगताप ः पाण्याच्या काटकसरीने वापराचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
नगर तालुका, ता. १८ ः आदर्श गाव हिवरे बाजार येथे झालेल्या ग्रामसभेत २०२६-२७ चा पाण्याचा ताळेबंद सादर करण्यात आला. पावसाचे मोजमाप करून पाण्याचे नियोजन करणारे हिवरे बाजार हे देशातील पहिले गाव असल्याचे प्रतिपादन धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांनी केले. गावाने सलग २२ व्या वर्षी ही परंपरा कायम ठेवली.
जगताप म्हणाले, की हिवरे बाजारने पावसाचा हिशेब मांडून पाण्याचे नियोजन करण्याचा आदर्श घालून दिला आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट, नेतृत्वाची दूरदृष्टी, शासकीय यंत्रणेचे सहकार्य आणि सकारात्मक पत्रकारिता महत्त्वाची ठरली. एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाचे संकट गडद होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध पाण्यानुसार पीकपद्धती ठरविणे आवश्यक आहे.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पाऊस आणि भूजलाचा अभ्यास करून पीकपद्धती ठरविल्यास पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले.
पोपटराव पवार म्हणाले, की १९९५ पासून गावात पाण्याच्या ताळेबंदानुसार पीकपद्धतीचे नियोजन केले जाते. गावातील ४३९ विहिरींपैकी ४३० विहिरींना पाणी आहे, तर नऊ विहिरी कोरड्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला दोन दिवसांतून एकदा ५०० लिटर पाणी दिले जाते. गेल्या २० वर्षांत नळपाणी योजनेच्या दुरुस्तीवर अवघा ८० हजार रुपये खर्च झाला आहे. महिला ही योजना चालवितात.
तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी जलसंवर्धन आणि वनसंवर्धनाच्या कामाचे कौतुक केले. ग्रामसभेला माजी सरपंच विमलताई ठाणगे, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, मोहटा देवस्थानचे विश्वस्त विक्रम वाडेकर आणि प्रशासक चंद्रकांत खाडे उपस्थित होते.
..........
पाण्याच्या ताळेबंदातील ठळक आकडे
चार दिवसांत झालेला पाऊस : ४०.९ मिलिमीटर
पावसातून उपलब्ध पाणी : ३९.९५ कोटी लिटर
गावाच्या वापरासाठी उपलब्ध पाणी : २७.०५ कोटी लिटर
वार्षिक पाण्याची गरज : ३५.२३ कोटी लिटर
दर्शविलेली पाण्याची तूट : ८.१७ कोटी लिटर
राखीव भूजल : २.६८ कोटी लिटर
..........
“यंदा गावात सरासरी ४०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे गावाच्या इतिहासातील सर्वांत कमी पर्जन्यमान आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बाहेरून पाणी आणण्याची गरज भासणार नाही.”
- पोपटराव पवार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.