फोटो : धैर्यशील मोहिते-पाटील, वसंतराव देशमुख
----
विजय मिळविण्यात अदृश्य शक्ती कुचकामी
मिळवलेली मते राष्ट्रवादी काँग्रेससाठी आशावादी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या निवडणुकीत उल्लेख केलेली अदृश्य शक्ती निवडणुकीच्या निकालानंतरही चर्चेत राहिली आहे. अदृश्य शक्तीच्या दाव्यामुळे निकालाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. महाविकास आघाडीला, राष्ट्रवादीला विजय मिळवून देण्यात अदृश्य शक्ती कुचकामी ठरली आहे. अदृश्य शक्तीमुळे महाविकास आघाडीच्या मतांची संख्या मात्र वाढली आहे. भाजपच्या ‘५०० पार’ घोषणेला ब्रेकही लागला आहे.
सूचकासाठी आवश्यक असलेली नऊ मतेही काँग्रेसकडे नसतानाही महाविकास आघाडीतून सोलापूरची जागा काँग्रेसला कशी सुटली, काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने ए व बी फॉर्म देऊन वसंतराव देशमुख यांची उमेदवारी का दिली, या प्रश्नांच्या उत्तरातच महाविकास आघाडीतील बिघाडी दडली आहे. पाच अपक्षांना माघार घ्यायला लावून सोलापूरची लढत राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख अशी सरळ करण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले होते. सरळ झालेल्या लढतीमुळे ही निवडणूक काहीशी चुरशीची झाल्याचे दिसले. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम जानकर, नारायण पाटील आणि अभिजित पाटील असे तब्बल तीन आमदार गमावले आहेत. गमावलेल्या आमदारांचे पडसाद येत्या काळात त्या-त्या विधानसभा मतदारसंघांत उमटण्याची दाट शक्यता आहे.
या मतदारसंघातील ६१६ मतदारांपैकी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीकडे तब्बल ४३४ मते होती. या तगड्या बहुमताला उघड आणि छुप्या मित्रांच्या आघाड्यांचा व अपक्षांचाही पाठिंबा होता. महाविकास आघाडीकडे फक्त ७८ एवढेच संख्याबळ होते. त्यातही काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे व त्यांचे १३ नगरसेवक सध्या कुठे आहेत, त्यांनी कोणाला मतदान केले, या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट न झाल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ जेमतेमच होते. भाजपच्या विरोधात कोण लढणार आणि कशी टक्कर देणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. खासदार मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी ही निवडणूक लढविली. या निवडणुकीत देशमुख यांना तीन अंकीदेखील मते मिळणार नाहीत, अशी व्यवस्था भाजपने केली होती. तरीदेखील देशमुख यांनी मतदारांना सन्मान देण्याची सर्वप्रथम सुरुवात केली. भाजपला स्वस्तात वाटणारी निवडणूक जरा महागातच पडल्याचे समजते. या निवडणुकीत जवळ काहीच नसताना देशमुख यांनी मिळविलेली ११८ मते जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला आशावादी राहण्यास उपयुक्त ठरू शकतात.
आता सामना डीसीसी बँकेत
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच विधान परिषदेची निवडणूक झाली आहे. येत्या काळात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. संबंध नसतानाही डीसीसीचा मुद्दा विधान परिषद निवडणुकीत आला होता. आता तर डीसीसीचीच निवडणूक होणार असल्याने डीसीसीमधील थकबाकीदारांचा मुद्दा अधिक प्रखरतेने चर्चेत येण्याची शक्यता आहे. हा मुद्दा तेवत ठेवणारे राजेंद्र राऊत आता जिल्ह्याचे आमदार झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात डीसीसी, जिल्हा दूध संघासह जिल्ह्याच्या इतर मुद्यांवर आमदार राऊत प्रभावीपणे काम करण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.