पुणे, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या शाळा, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि समाजाला एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडण्यासाठी पुणे जिल्हा परिषद आणि ओपनलिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून ‘जिजाऊ पालक सहभाग मंच’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी (ता. १५) जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि समाजाला जोडणारे प्रभावी केंद्र म्हणून अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने हे डिजिटल व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. ‘जिजाऊ’च्या माध्यमातून प्रत्येक शाळेला स्वतंत्र डिजिटल ओळख मिळणार असून, शाळेची माहिती, विविध उपक्रम, शाळेच्या समित्या, विकास आराखडे, सूचना, कार्यक्रमांची दिनदर्शिका, विद्यार्थी व शिक्षकांच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती, प्रकाशने आणि माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. शाळांना योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची माहितीही या व्यासपीठावर उपलब्ध करून देता येणार आहे. पालकांना संबंधित शाळेच्या डिजिटल बोर्डवरील क्यूआर कोड किंवा वेब लिंकच्या माध्यमातून ॲप सुरू करता येणार आहे.
इतर शाळांना प्रेरणा मिळणार
ॲपबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल प्रवाहाशी जोडली जावी, शाळांना त्यांच्या गुणवत्तेची, नावीन्यपूर्ण उपक्रमांची आणि यशाची प्रभावी मांडणी करता यावी, तसेच एका शाळेतील चांगल्या उपक्रमातून इतर शाळांना प्रेरणा मिळावी, हा ‘जिजाऊ’ उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.’’
प्रत्येक शाळेला आपल्या कार्याची, उपक्रमांची आणि गुणवत्तेची डिजिटल स्वरूपात प्रभावी मांडणी करता येणार असल्याने शाळांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल. माजी विद्यार्थ्यांनाही आपल्या शाळेशी पुन्हा जोडले जाण्याची आणि शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याची संधी या माध्यमातून मिळेल. पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि समाजाचा शाळेतील सहभाग वाढवून शाळांच्या विकासाला लोकसहभागाची जोड मिळेल.
- वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
42658
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.