तीन वर्षे नाणी जमवून
खरेदी केली दुचाकी
तेलंगणातील जोसेफ यांची बचत फळाला
हैदराबाद, ता. १३ (पीटीआय) : थेंबे थेंबे तळे साचे...या उक्तीप्रमाणे अनेक जण दररोज थोडे थोडे पैसे बाजूला काढून भविष्यात मोठी खरेदी करतात. याचा प्रत्यय नुकताच आला. तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील बी. रवी जोसेफ (वय ५१) यांनी सलग तीन वर्षे दहा रुपयांची नाणी साठवली आणि त्यातून जमलेल्या तब्बल एक लाख २३ हजार रुपयांतून स्कूटर खरेदी केली.
लक्षेट्टीपेट येथील रहिवासी रवी जोसेफ यांनी दररोजच्या व्यवहारांतून, विशेषतः किराणा खरेदी करताना मिळणारी दहा रुपयांची नाणी १० ऑक्टोबर २०२३ पासून साठवण्यास सुरुवात केली.सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी त्यांना या सवयीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. दहा रुपयांची नाणी चलनातून बाद होणार असल्याच्या अफवांमुळे त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, जोसेफ यांनी बचत सुरूच ठेवली. जुने वाहन वारंवार बिघडू लागल्याने नवीन स्कूटर घेण्याचा निर्णय घेतल्याचे रवी जोसेफ यांनी सांगितले. स्कूटरच्या शोरूमच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी जोसेफ यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी शोरूममध्ये येऊन नाण्यांच्या स्वरूपात पैसे स्वीकारले जातील का, याची चौकशी केली होती. शोरूमने त्यासाठी होकार दिला. त्यानंतर रवी जोसेफ यांनी दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात एक लाख २३ हजार रुपये आणले आणि नवीन स्कूटरचा ताबा घेतला.
दोन तास नाणी मोजली
शोरूममधील कर्मचाऱ्यांनी त्यांनी आणलेली नाणी मोजण्यासाठी जवळपास दोन तास घेतले. त्यानंतर एकूण रक्कम निश्चित करून त्यांना स्कूटरचा ताबा देण्यात आला. घरासाठी उपयुक्त वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली बचत अखेर नवीन वाहन खरेदीसाठी उपयोगी ठरली. बुलेट घेण्याचीही त्यांची इच्छा होती; मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ती खरेदी करता आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.