‘कऱ्हाड बार’चा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्यास निःशुल्क चालवणार
कऱ्हाड, ता. १५ ः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य व रास्त दर मिळावा, या न्याय मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला कऱ्हाड बार असोसिएशनने पाठिंबा दिला. ऊस उत्पादक शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टावर साखर उद्योग उभा आहे. मात्र, वाढता उत्पादन खर्च, मजुरी, खते, औषधे, वाहतूक आणि शेतीसाठी लागणाऱ्या अन्य खर्चांचा विचार करता शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या घामाला आणि कष्टाला न्याय मिळवून देण्यासाठी ऊस दरवाढीची मागणी ही रास्त असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळेच वकील संघटनेने पाठिंबा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पुणे-बंगळूर महामार्गावरील कोगनली टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी बार असोसिएशनची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देणे, ही सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी वर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची भावना आहे.
बैठकीत असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. दीपक थोरात म्हणाले, ‘‘शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या न्याय मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला असोसिएशनचा पाठिंबा आहे. शासनाने आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यास ते खटले बार असोसिएशनचे सदस्य निःशुल्क चालवतील.
यावेळी उपाध्यक्ष ॲड. अमोल कणसे, सचिव ॲड. मयूर एम. माने, सहसचिव ॲड. राजवर्धन पाटील, खजिनदार ॲड. रोहित माळी, ॲड. विद्या म्होप्रेकर उपस्थित होते. कऱ्हाड उत्तरचे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, जिल्हा उपाध्यक्ष बापू यादव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष देवानंद पाटील उपस्थित होते.
W58664
कऱ्हाड ः बार असोसिएशनच्या बैठकीत सहभागी पदाधिकारी.
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.