मार्केट यार्ड, ता. २४ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी दुधाच्या खरेदीसाठी होणारी लगबग यंदा कमी झाल्याचे चित्र आहे. गणेश पेठेतील दूध बाजारात शनिवारी अठरा लिटरच्या घागरीला १३०० रुपये भाव मिळाला. गतवर्षी याच काळात हा भाव १३५० ते १४०० रुपयांदरम्यान होता. यंदा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस पौर्णिमा असल्याने दुधाची खरेदी विभागली जाण्याची शक्यता असून, त्याचाही मागणीवर परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
कोजागरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची परंपरा असल्याने या काळात दुधाला मोठी मागणी असते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर दूध खरेदी केले जाते. तसेच पेढे, बर्फी आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मिठाई व्यावसायिकांकडूनही दुधाला मागणी असते. मात्र, यंदा अपेक्षेप्रमाणे खरेदी होत नसल्याने बाजारातील व्यवहार मंदावले आहेत.
दसऱ्याच्या दिवशी अठरा लिटरच्या घागरीचा भाव १५०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, कोजागरीच्या तोंडावर हा भाव १३०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे दसऱ्याच्या तुलनेत घागरीमागे २०० रुपयांची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेतही यंदा दुधाचे दर कमी आहेत.
दरम्यान, शनिवारी गणेश पेठ दूध बाजारात पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे अडीच ते तीन हजार लिटर दुधाची आवक झाली. पुढील दोन दिवसांत पौर्णिमेनिमित्त खरेदी वाढण्याची अपेक्षा असली, तरी यंदा गतवर्षीइतका उत्साह नसल्याचे गणेश पेठ दूध बाजार खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे आणि दूध व्यावसायिक विष्णू मोरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.