मंचर, ता. १३ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत मंचर येथे आदिवासी मुला-मुलींसाठी असलेल्या
शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या वसतिगृहांच्या दक्षिण बाजूस दाट जंगल व डोंगराचा उतार असल्याने या परिसरात बिबट्या, तरस तसेच विषारी सापांचा वावर असतो. त्यामुळे वसतिगृहाबाहेर पडताना विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मुलींच्या वसतिगृहाच्या संरक्षक भिंतीवर पत्रे लावण्यात आल्याने तेथील सुरक्षा तुलनेने अधिक बळकट आहे.
उच्च शिक्षणासाठी नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यांतील विद्यार्थी येथे वास्तव्यास आहेत. दोन्ही वसतिगृहांत प्रत्येकी ३६ खोल्या असून प्रत्येक खोलीची क्षमता सात विद्यार्थ्यांची आहे. मुलांच्या वसतिगृहात सध्या १६० विद्यार्थी आहेत, असे गृहपाल रवींद्र माळवे यांनी सांगितले.
मुलींच्या वसतिगृहात सध्या १२८ विद्यार्थिनी असून एकूण २९६ विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार असल्याचे गृहपाल भाग्यश्री थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही वसतिगृहांच्या मागील बाजूस मंचर पोलिस ठाण्याची इमारत आणि समोर पोलिस वसाहत आहे.
दृष्टिक्षेपात
- मुलांच्या वसतिगृहाभोवती केवळ पाच फूट उंचीची संरक्षक भिंत
- भिंतीवर सर्वत्र तारेचे कुंपण नसल्याने विद्यार्थी थेट भिंतीवरून ये-जा
- वन्यप्राणी किंवा सर्पांना वसतिगृहाच्या परिसरात प्रवेश करण्याचा धोका
- वसतिगृहाच्या पूर्वेला भिंतीच्या बाहेर कचऱ्याचा ढीग असल्याने दुर्गंधी
खिडक्यांच्या काचा तुटलेल्या
अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाकडे जाण्यासाठी विद्यार्थी जंगलातून सुमारे ५०० मीटरची पाऊलवाट वापरतात. मुलांच्या वसतिगृहातील काही खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून १६ पैकी आठ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
खोलीच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत. उन्हाळ्यात वरांड्यात आलेले दोन साप पाहिले. बिबट्या, तरस आणि सर्पांचा वावर असल्याने जीव मुठीत धरूनच बाहेर पडावे लागते.
- प्रतीक मते व करण हगवणे, निवासी विद्यार्थी
सुरक्षा व भोजन व्यवस्था उत्तम आहे; मात्र आजूबाजूला जंगल असल्याने भीती वाटते.
- साक्षी मेमाणे, निवासी विद्यार्थिनी
पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटल्याने वसतिगृहाचा पाणीपुरवठा बंद आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून नगरपंचायतीकडून पाणी उपलब्ध करून देण्यात येत असून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिसरात वेळोवेळी थायमेटचा वापर केला जातो. कचरा उचलण्यासाठी वेळेत कचरा गाडी यावी म्हणून नगरपंचायतीकडे संपर्क केला जात आहे.
- रवींद्र माळवे, गृहपाल मुलांचे वसतिगृह मंचर
सायंकाळी सहानंतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असून येथील सुरक्षा व्यवस्था भक्कम आहे.
- भाग्यश्री थोरात, गृहपाल मुलींचे वसतिगृह मंचर
मुलांचे निवासी वसतीगृह :
विद्यार्थी संख्या: क्षमता २५०, सध्या १६०
मुलींची संख्या : क्षमता : २९६ सध्या १२८
कार्यरत असलेली पदे
गृहपाल : १
लेखनिक : १
वार्डन : १
सुरक्षा रक्षक : १
बाह्य कामगार : ३
मुलींचे वसतीगृह :
कार्यरत असलेली पदे
गृहपाल : १
लेखनिक : १ (अन्य ठिकाणी)
सुरक्षा रक्षक : रिक्त
बाह्य कामगार : ३ (त्यापैकीच एक जण चौकीदार म्हणून काम करतो)
16352, 16353
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.