जोडोनिया कर
पेस्टिंग २० मे
.............
जाको नाम निरंजन कहिए
(उत्तरार्ध)
‘बाला मैं बैरागन होंगी’ या पदामध्ये संत मीराबाई यांनी भगवान श्रीकृष्णाविषयीची अखंड, अतूट आणि समर्पित भक्ती अत्यंत हृदयस्पर्शी रूपकांतून व्यक्त केली आहे. यात भक्ताची ईश्वराशी असलेली आदरभावना, एकनिष्ठ प्रेम आणि संपूर्ण आत्मसमर्पण व्यक्त होते. हे पद माधुर्यभक्ती, अनन्य प्रेम आणि आत्मनिवेदनाचा सुंदर आविष्कार आहे. मी तुझ्यासाठी वैरागी होईन; संसार त्यागेन; सहा रिपुंचा मोह आणि सासूरवास टाळून तुझ्या भक्तीत, नामात, पूजेत, स्मरणात रममाण होईन असे मीराबाई श्रीकृष्णाला सांगतात. शील, समता, संतोष हे भाव मी माझ्या मनात ठेवीन असे वचन मीराबाई भगवंतांना देतात. उत्तम तोच विचार करणे, सर्वांविषयी चांगला विचार करणे, उत्तम आचरण करणे, उत्तम चारित्र्य बाळगणे हे सर्व उत्तम शीलाचे द्योतक आहेत. समता म्हणजे सर्व सुखे आणि दुःखे, लाभ आणि हानी, जय आणि पराजय यांच्याकडे स्थितप्रज्ञतेने, समत्वाने पाहणे. आनंदाने उचंबळून न जाणे आणि दुःखाने कोलमडून न पडणे हे समतेचे द्योतक आहे. सर्वांमध्ये ईश्वर पाहणे हे समतेचे द्योतक आहे. सुखात आणि दुःखातही संतोषाने राहण्याचे वचनही मीराबाई भगवंतांना देतात. त्या कृष्णाला आणखी एका पदात म्हणतात,
ऐसी लगन लगाइ, कहां तू जासी।।
तुम देखे बिन, कलि न परति है,
तलफि तलफि जिव जासी।
तेरे खातिर जोगण हूँगा,
करबत लूँगी कासी।
मीरां के प्रभु गिरधरनागर,
चरण केवल की दासी।।
हे श्रीकृष्णा, तू अशी कशी मला तुझी सवय, गोडी लावलीस? मला तुझ्या प्रेमात गुंतवून का टाकलेस? तुला पाहिल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाही. काही सुचत नाही. तुझ्या भेटीविना तडपून तडपून, झुरून झुरून, माझा जीव जातो की काय असे मला वाटते आहे. तुझी भेट झाली नाही तर आणि तुला भेटण्यासाठी मी जोगीण होऊन जाईन. तुझ्या भेटीसाठी अगदी मी काशीमध्ये करवतीने स्वतःला कापून या देहातून मुक्त होईन. (बनारस काशीमध्ये असा समज आहे, की काशीमध्ये करवतीने कापून मृत्यू आल्यास मुक्ती मिळते!) या मीराबाईचे तुम्हीच परमदयाळू परमेश्वर आहात आणि मी तुमच्या चरणांची दासी आहे.
drsunildeshpande@gmail.com
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.