शिक्रापूर, ता. ९ ः तीन महिन्यांत जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्धार असलेल्या ‘मिशन-५३’ला पिंपळे-जगताप ग्रामस्थांनी तब्बल तीन तास चर्चा करून पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. शाळेच्या विकासासाठी गरज पडल्यास गाव यात्रेतील वर्गणीही देण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शविली. ‘आम्ही पहिल्या पाच क्रमांकांत येऊनच दाखवू,’ असा निर्धार शाळेतील शिक्षक उमेश जगताप गुरुजी यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले हे ‘मिशन-५३’साठी आग्रही असून, पाबळ-केंदूर गटातील ५३ जिल्हा परिषद शाळांमधील १५१ शिक्षकांचे प्रशिक्षण जालिंदरनगर (ता. खेड) येथील शाळेत मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या माध्यमातून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गटातील प्रत्येक गावात मिशन-५३च्या अनुषंगाने बैठका सुरू झाल्या आहेत. या मालिकेतील दुसरी बैठक बुधवारी (ता. ७) पिंपळे-जगताप येथे झाली. या बैठकीला महिला, युवक आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
‘‘गावाने जिल्हा परिषद शाळेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,’’ असे आवाहन प्रफुल्ल शिवले यांनी केले. मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शाळेतील पटसंख्या कमी होणे ही केवळ शिक्षणव्यवस्थेची समस्या नसून गावासाठी आत्मपरीक्षणाची आणि ग्राम अपमानाची बाब असल्याचे सांगितले. केवळ इंग्रजी माध्यम म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण नव्हे; विद्यार्थ्यांना जपानी आणि जर्मन भाषांसह जागतिक स्तरावरील ज्ञान मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना जागतिक सिद्ध करणे म्हणजे जागतिक दर्जा असल्याचे सांगितले.
यावेळी कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, शेखर थिटे, पोलिस पाटील वर्षा थिटे, संदीप पऱ्हाड, शिवाजी वाडेकर, दीपाली तांबे, संदीप जगताप, सागर शितोळे, विशाल बेंडभर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले.
मुले विकसित झाली तर संपूर्ण गाव विकसित होईल. त्यामुळे आमच्या गावच्या सर्व महिला भगिनी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ गावातील सर्व भेदाभेद दूर ठेवून पूर्ण ताकदीने मिशन-५३ च्या पाठीशी उभे आहोत. गावच्या यात्रेवेळीची वर्गणीही या उपक्रमाला आणि शाळेसाठी आम्ही देण्यासाठी तयार आहोत.
-शिवाजी जगताप, माजी सरपंच, पिंपळे-जगताप (ता. शिरूर)
मुले चांगली शिकवा, उत्तम कौशल्ये विकसित करा, जगात कुठेही उतरली तरी ती यशस्वीच होतील अशी त्यांना शाळा स्तरावरच बनवा, असे मी ग्रामस्थांना सांगताच, ज्या उत्स्फूर्तपणे टाळ्या दिल्या गेल्या त्यावरून ’मिशन-५३’ हे जिल्हा-राज्य नाही तर देश पातळीवर हमखास मैलाचा दगड ठरेल.
- सतीश वाबळे, माजी अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाबळेवाडी शाळा (शिक्रापूर)
गावाबाहेर २०० मुले शाळेसाठी जातात. पर्यायाने या मुलांची शालेय फी काही कोटींपर्यंत जाते. हेच पैसे गावचे वाचतील यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी आमच्या पाल्यासाठी मिशन-५३साठी पुढाकार घेत असून मी गेली ५ वर्षे माझ्या पदावरून जे सांगत होते, तेच आज सत्यात येत असल्याने आम्ही सर्व महिला आता पूर्णपणे या उपक्रमात पुढे होऊन काम करीत आहोत.
दीपाली तांबे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती तथा ग्रामपंचायत सदस्या, पिंपळे-जगताप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.