उत्तर भारत
हिमाचलवर आर्थिक
बोजा पडणार
सिमला : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव बदलून ‘व्हीबी-जी राम जी’ करण्यासह निधी व अंमलबजावणीची नवी पद्धत लागू करण्याच्या निर्णयाला हिमाचल प्रदेश सरकारने तीव्र विरोध केला आहे. ग्रामीण विकास मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी या बदलांमुळे राज्यावर दरवर्षी १६४.६३ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचा दावा केला. नवीन व्यवस्थेमुळे रोजगारनिर्मिती कमी होण्याची शक्यता असून मजुरांचे दैनंदिन वेतनही घटेल, असे त्यांनी म्हटले. तसेच ग्रामपंचायतींचे अधिकार कमी होऊन केंद्रीकृत डिजिटल मंजुरी प्रक्रियेमुळे डोंगराळ भागांमध्ये अडचणी वाढतील, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली.
----
दक्षिण भारत
एक किलोहून सोन्यासह
प्रवासी अटकेत
मलप्पुरम (केरळ) : केरळमधील करिपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून एक किलोहून अधिक वजनाची दहा सोन्याची बिस्किटे जप्त केली. किझिस्सेरी येथील अस्लम हा रियाधहून गुरुवारी सकाळी आला होता. सीमाशुल्क तपासणी चुकवून त्याने आपत्कालीन दिव्यामध्ये सोने लपविल्याचा आरोप आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विमानतळाबाहेर त्याची तपासणी केली असता दिव्यामध्ये प्रत्येकी १०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची सोन्याची दहा बिस्किटे आढळली.
---
दिल्ली व परिसर
अपहार प्रकरणात
एफआयआरची मागणी
नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहारप्रकरणी ‘एफआयआर’ नोंदवून कालबद्ध चौकशी करावी आणि दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी केली आहे. परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी चौकशी चार महिन्यांत पूर्ण करून प्रकरणाचा जलदगती न्यायालयात रोज सुनावणीद्वारे खटला निकाली काढावा, असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने प्राथमिक अहवाल उत्तर प्रदेश सरकारकडे सादर केला असून अंतिम अहवाल पुढील दहा ते पंधरा दिवसांत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
हिंसाचारप्रकरणी
नेते अटकेत
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्यात विशेष मतदारयादी फेरपडताळणी (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्थानिक राजकीय नेता सयेम चौधरी उर्फ बाबू चौधरी याला अटक केली. कोलकाता येथील एनआयए कार्यालयात चौकशीनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. चौधरीवर एक एप्रिल रोजी ‘बीडीओ’ कार्यालयात न्यायिक अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे रोखून धरणे, कायदा-सुव्यवस्था बिघडविणे आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा आरोप आहे. या हल्ल्यात नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
---
‘एअर सुविधा २.०’
पोर्टल सुरू
नवी दिल्ली : आफ्रिकेतील काही भागांमध्ये इबोला आजाराचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य देखरेख अधिक प्रभावी करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने ‘एअर सुविधा २.०’ हे अद्ययावत व संपर्कविरहित आरोग्य स्वघोषणा पोर्टल सुरू केले. या पोर्टलद्वारे भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना २१ दिवसांचा प्रवास इतिहास, संपर्क आणि लक्षणांची माहिती ऑनलाइन सादर करावी लागेल. प्रवासी आगमनाच्या २४ तास आधी अर्ज भरू शकतात.
---
औषधांवर
क्यूआर कोड
नवी दिल्ली : बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने क्यूआर कोड आधारित ‘ट्रॅक अँड ट्रेस’ प्रणालीचा विस्तार करून सर्व प्रतिजैविके, लसी, कर्करोगावरील औषधे तसेच अमली व मानसिक आजारांवरील औषधांचा समावेश केला आहे. सुधारित नियमांनुसार उत्पादकांना औषधांच्या पॅकेजिंगवर बारकोड किंवा क्यूआर कोड देणे बंधनकारक राहील. या कोडमध्ये औषधाचे नाव, उत्पादक, बॅच क्रमांक, उत्पादन व अंतिम वापराची तारीख यांसारखी माहिती असेल. लसी, कर्करोगावरील आणि अमली औषधांसाठी हा नियम १ जुलै २०२६ पासून, तर प्रतिजैविकांसाठी १ जुलै २०२८ पासून लागू होईल.
-----
उत्तर भारत
उत्तर प्रदेश, दिल्लीत
‘ईडी’चे छापे
लखनौ : गाझियाबादमधील कथित जमीन व रिअल इस्टेट फसवणूक प्रकरणाच्या मनी लॉन्डरिंग तपासाअंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले. ‘श्रेष्ठ प्रॉपबिल्ड’चे प्रवर्तक संदीप सिंग, सेवा सुरक्षा सहकारी आवास समितीचे पदाधिकारी आणि इतर काही जणांविरुद्ध तपास सुरू आहे. आरोपींनी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सदनिका देण्याचे आश्वासन देऊन समितीच्या सदस्यांना गाझियाबादमधील अकबरपूर बेहरामपूर येथील ४१,५४४ चौरस मीटरपेक्षा अधिक जमिनीवरील हक्क सोडण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.