नीळकंठेश्वर साखर कारखान्याच्या
४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ
------
ॲग्रोवन वृत्तसेवा
लातूर : किल्लारी (ता. औसा) येथील श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (ता. १५) महेश महाराज माकणीकर यांच्या हस्ते झाला. या वेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आलेल्या अडचणींवर मात करून हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आपला ऊस याच कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार पवार म्हणाले, की नीळकंठेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि मालमत्तेवरील कर्जाचा बोजा यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करणे शक्य झाले. नीळकंठेश्वराच्या कृपेने कारखान्याची प्रगती सुरू असून, शेतकऱ्यांनी हा आपलाच कारखाना समजून जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी द्यावा. आगामी काळात उपपदार्थनिर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
महेश महाराज माकणीकर म्हणाले, की साखर कारखाना उभारणे आणि तो चालविणे किती अवघड असते, याची जाणीव कारखान्याच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर होते. जमीन आणि आर्थिक अडचणी असतानाही नवीन स्वतंत्र कारखाना उभारण्याऐवजी सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार पवार यांनी कारखाना सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत.
सध्याच्या काळात अनियमित पाऊस आणि पिकांची घटती उत्पादकता यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतीत प्रगती साधावी. गळीत हंगामात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन महेश महाराज यांनी केले.
या वेळी औसा बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, संतोष मुक्ता, काकासाहेब मोरे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. परीक्षित पवार, कार्यकारी संचालक डी. एल. पतंगे, प्रकाश पाटील, गोविंद भोसले, शरद भोसले, सतीश भोसले, राम पाटील, गौरीशंकर बालकुंदे, बंकट पाटील, नाना धुमाळ, बळीराम पाटील, ओम बिराजदार, परमेश्वर धुमाळ आणि सिद्धेश्वर बालकुंदे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि मान्यवर उपस्थित होते.
मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊसपुरवठा करणारे महादेव दादाराव भोसले (मालोजा), मुरलीधर मारुती लोमटे (येळष्ट), ज्ञानेश्वर विक्रम मनाळे (सरो), राम मारुती माने आणि राम विश्वंभर गांजनखेडे पवार (करजगाव) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो ओळी ---
लातूर : किल्लारी येथील श्री नीळकंठेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून करताना आमदार अभिमन्यू पवार, महेश महाराज माकणीकर आणि पदाधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.