ऑनलाइनद्वारे ३० लाखांची फसवणूक
पिंपरी : संचालकाचा बनावट आयडी तयार करून कंपनीची ३० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गजेंद्र भारत भोरे (रा. काळेवाडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. भोसरीतील बालाजीनगर येथील जीएनएस इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ही घटना घडली. आरोपीने संचालकांच्या नावाने बनावट आयडी तयार करून कंपनीच्या ‘मायक्रोसॉफ्ट टीम्स’ ग्रुपमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर बँकेचा तपशील पाठवून तातडीने ३० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. संचालकांचा मेसेज समजून कंपनीने पैसे ट्रान्सफर केले असता ही फसवणूक उघडकीस आली.
गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांचा गंडा
पिंपरी : खाद्यपदार्थ आयात-निर्यात व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ६४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी मनोज पाटील, दिगंबर सूर्यवंशी यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
विकी हनुमंते (रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. आरोपींनी ‘ग्रो कॅपिटल’ आणि ‘विश्वांजली व्हेंचर्स’ कंपन्यांच्या माध्यमातून दरमहा १० टक्के नफ्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादी व इतरांकडून ८४ लाख ५१ हजार रुपये गुंतवून घेतले. त्यापैकी काही रक्कम परतावा म्हणून देऊन उर्वरित ६४ लाख ८५ हजार ३४८ रुपये न देता आरोपींनी फसवणूक केली.
दारूसाठी पैसे नाकारल्याने प्रवाशाला मारहाण
पिंपरी : रिक्षाचे ठरलेले भाडे न घेता दारूसाठी अतिरिक्त २०० रुपये मागितले असता, ते देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशाच्या डोक्यात रिक्षाचालकाने लोखंडी शस्त्र मारून जखमी केले. भुमकर चौक येथे ही घटना घडली. आकाश चंदनशिवे (रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हणमंत बिराजदार आणि मंगेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादीने ठरल्याप्रमाणे २० रुपये भाडे दिले असता, आरोपींनी दारूसाठी पैशांची मागणी केली.
जुन्या भांडणातून तरुणावर हत्याराने वार
पिंपरी : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याचा राग धरून तरुणावर हत्याराने वार करण्यात आले. नेरे-कासारसाई रस्त्यावरील पेट्रोल पंपावर ही घटना घडली. ओमकार जाधव (रा. नेरे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोपाळ साळुंखे (रा. म्हाळुंगे) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. फिर्यादी पेट्रोल पंपावर काम करत असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांच्याशी हुज्जत घातली आणि हातावर हत्याराने वार करून जखमी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.