पिंपरी, ता. १९ : पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक केबल्सकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली. केबल्स ऑपरेटर्सकडून माहिती व कागदपत्रे मागितली आहेत. ३० दिवसांत ती सादर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
शहरातील रस्त्यांवर दिवाबत्तीचे खांब, झाडे, इमारतींंवरून विविध प्रकारच्या केबल्स अनधिकृतपणे टाकलेल्या आहेत. त्यातील काही तुटलेल्या असून लोंबकळणाऱ्या आहेत. त्यांतील एका केबलमध्ये अडकून प्राधिकरणात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत ‘केबल टाकल्या, आम्ही नाही पाहिल्या’ असे वृत्त ‘सकाळ’ने ११ मे रोजी प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. विद्युत खांबांवरून विविध केबल्स ओढल्याचे निदर्शनास आले आहे. ‘‘या केबल टाकण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नसून, महापालिकेकडून अशा प्रकारची कोणालाही परवानगी दिलेली नाही,’’ असे विद्युत विभागाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच अशा कारवाईमुळे जनतेस होणाऱ्या गैरसोयीसाठी महापालिका जबाबदार राहणार नसून, संबंधित केबल ऑपरेटर्स यांनाच त्यासाठी जबाबदार धरले जाईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
महापालिका प्रशासन म्हणते....
महापालिकेच्या खांबांवरून अनधिकृतपणे ओढलेल्या इंटरनेट व टीव्ही केबल्समुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
केबल्समुळे महापालिकेच्या विद्युत खांबांचे व व्यवस्थेचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न
अनधिकृत केबल्समुळे शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असून, अनेक नागरिक, अशासकीय सेवाभावी संस्था, महापालिकेचे पदाधिकारी व सदस्य यांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत
- नियमानुसार महानगरपालिकेच्या खांबांवर पूर्वपरवानगीशिवाय ओढलेल्या इंटरनेट व टीव्ही केबल्स या महानगरपालिकेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण मानले जाते
- कोणतीही केबल टाकण्यासाठी महापालिकेच्या परवाना विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीद्वारे उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर केबल’ नेटवर्कचा वापर करणे अथवा त्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक
महापालिकेने ३० दिवसांत ऑपरेटर्सकडून मागितलेली कागदपत्रे
१) वैध परवाना
२) एमएसएमई / जीएसटी प्रमाणपत्र
३) केबल ऑपरेटरचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, स्थानिक कार्यालयाचा पत्ता पुरावा व शॉप ॶॅक्ट परवाना
४) ऑपरेटरचे केवायसी तपशील : आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्र माहिती
५) महापालिकेच्या एसओपी नुसार काम करणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळणे आदी बाबींसंदर्भातील योग्य रकमेच्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र
६) टी.व्ही. / इंटरनेट / दूरध्वनी / वीजपुरवठा व इतर प्रकारच्या केबल्स ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड पद्धतीने कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत टाकण्यात आल्या आहेत, याची तसेच एकूण लांबीची माहिती
७) ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड केबलसाठी यापूर्वी महापालिकेस शुल्क अदा केले असल्यास त्याच्या पावतीची छायांकित प्रत
८) केबल टाकण्यासाठी महापालिकेने दिलेल्या परवान्याची छायांकित प्रत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.