पिंपरी, ता. २२ : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बसचे गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या मार्गांवर २७ अपघात नोंदवले गेले आहेत. यामध्ये १२ जणांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले आहेत. तर, शहरात विविध ठिकाणी एका आठवड्यात तीन अपघात झाले आहेत. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक नियम उल्लंघनासह बसचालकांचा बेदरकारपणा प्रवासी आणि अन्य वाहन चालकांच्या जिवावर बेतत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
‘पीएमपी’कडून पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात ‘पीएमआरडीए’ हद्दीत दररोज सुमारे १,७०० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. यातून सरासरी १० लाखांवर नागरिक प्रवास करतात. ‘पीएमपी’च्या ताफ्यात स्वमालकी आणि ठेकेदारांच्या बसचा समावेश आहे. या बससाठी खासगी ठेकेदाराचे आणि स्वमालकीचे चालक कार्यरत आहेत. या बसचालकांकडून वाहतूक सिग्नल तोडणे, भरधाव बस चालवणे, मोबाइलचा वापर करणे, इअरफोन लावून गाणी ऐकणे, फोनवर बोलणे असे कृत्य केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे ‘पीएमपी’ बसचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामध्ये जीवित आणि आर्थिक हानी होत असून गंभीर जखमींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एप्रिल ते सप्टेंबर-२०२६ या काळातील बहुतांश अपघातांमध्ये बसचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे.
अध्यक्षांच्या आदेशालाच केराची टोपली
‘पीएमपी’ बस चालवताना मोबाईल, इअरबड्स वापरण्यास बंदी आहे. याबाबतचा आदेश तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी चार सप्टेंबर २०२५ रोजी दिला होता. पण, काही बसचालक आजही सर्रास मोबाईल आणि इअरबड्स वापर करताना दिसून येत आहेत. चालकांनी अध्यक्षांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवल्याने या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मागील आठवड्यातील अपघात
१७ ऑक्टोबर : पिंपळे गुरव येथे नियंत्रण कक्षाला बस धडकली
१८ ऑक्टोबर : काळभोरनगर, आकुर्डी येथे महिला दुचाकीस्वाराला धडक
२१ ऑक्टोबर : निगडी परिसरात दुचाकीस्वाराला धडक
कालावधी :
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६
अपघातांची संख्या : ४३
मृत्यू : २५
जखमी : २५
नियमांचे उल्लंघन केल्यास येथे करा तक्रार
संपर्क क्रमांक : ०२०-२४५४५४५४
व्हॉट्सॲप क्रं. : ९८८१४९५५८९
ई-मेल : complaints@pmpml.org
अपघातानंतर तातडीने चौकशी करून संबंधित बसचालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई दंडात्मक कारवाई केली जाते.
- नागेश गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, ‘पीएमपीएमएल’
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वांनीच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.