टाकळी हाजी, ता. १७ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरात सप्टेंबर बहारातील डाळिंब उत्पादनासाठी शेतकऱ्यांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. पानगळ करून झाडांना बहारासाठी तयार करण्यापूर्वी बागेची मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, जमिनीची सुपीकता वाढविणे आणि आवश्यक अन्नद्रव्यांचे नियोजन करण्याची कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
बहार डाळिंबासाठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा मानला जातो. पानगळ करण्यापूर्वी बागेतील अनावश्यक फांद्या, फुटवे व तण व्यवस्थापन, जमिनीची मशागत तसेच झाडांच्या मुळांच्या परिसरात सेंद्रिय खत मिसळण्याची कामे शेतकरी करीत आहेत. यामुळे पुढील बहारात झाडांची वाढ, फुलोरा आणि फळधारणेसाठी बागेची तयारी केली जाते.
सेंद्रिय खतांमध्ये शेळी-मेंढीचे खत, शेणखत, कंपोस्ट तसेच निंबोळी पेंड यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. विशेषतः शेळी-मेंढीच्या खतासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शोध घेत असून, त्यामुळे या खतांच्या मागणीतही वाढ झाली आहे.
सेंद्रिय खतांसोबतच माती परीक्षण व बागेच्या गरजेनुसार नत्र, स्फुरद, पालाश तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, झिंक यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन केले जात आहे. मात्र खतांचा वापर जमिनीची सुपीकता, पाण्याची गुणवत्ता, झाडांचे वय आणि मागील बहारातील स्थिती लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याकडे शेतकरी लक्ष देत आहेत.
टाकळी हाजी, निमगाव दुडे, माळवाडी, वडनेर, जांबूत, कवठे येमाई, म्हसे परिसरातील अनेक गावांमध्ये डाळिंब हे प्रमुख पीक असल्याने सप्टेंबर बहाराच्या तयारीला विशेष महत्त्व आहे. यंदा हवामानातील बदल, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि बागेतील रोग-किडींचे व्यवस्थापन या बाबींचाही विचार करून शेतकरी बहाराचे नियोजन करीत आहेत.
खतांची मागणी वाढली
सप्टेंबर बहारासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बागांची पूर्वमशागत सुरू झाल्याने शेळी-मेंढीचे खत, शेणखत, निंबोळी पेंड, विविध सेंद्रिय निविष्ठा तसेच रासायनिक व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांची मागणी वाढली आहे. त्यामुळे खत विक्रेते, पशुपालक आणि मजुरांनाही या काळात चांगली मागणी निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.