पुणे

निधीअभावी बार्टीच्या कौशल्य प्रशिक्षणाला ब्रेक?

CD

प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १३ : वंचित समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कौशल्य विकास विभागासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा एकही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झालेला नाही. परिणामी, हा विभाग बंद पडणार का, असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत ‘बार्टी’च्या प्रभारी महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
‘बार्टी’च्या कौशल्य विकास विभागाला २०२३-२४ मध्ये सात कोटी, २०२४-२५ मध्ये २१ कोटी आणि २०२५-२६ मध्ये १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यापैकी अनुक्रमे सात कोटी, २१ कोटी आणि १३ कोटी ८५ लाख रुपये खर्च झाले. गेल्या चार वर्षांत बार्टीने सुमारे नऊ हजार तरुणांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. त्यातून त्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या.
मात्र, आता ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. निधीचा विनियोग होत असताना यंदा तरतूद का करण्यात आली नाही? प्रशिक्षण योजनेचे स्वरूप बदलणार का? जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील संधी कशा मिळणार? तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारासाठी तयारी करणाऱ्या तरुणांचे भवितव्य काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

वंचित तरुणांच्या रोजगाराच्या संधीवर गदा
स्टुडंट हेल्पिंग हँड्सचे संस्थापक कुलदीप आंबेकर म्हणाले, ‘‘बार्टी ही केवळ विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणारी संस्था नाही. वंचित समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना प्रशिक्षण मिळाले असून, त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. असे असताना, प्रभावीपणे काम करणाऱ्या कौशल्य विकास विभागासाठी निधीची तरतूद का करण्यात आली नाही? हा विभाग बंद करण्यामागचे नेमके कारण काय? निधी रोखण्याचा निर्णय कोणी घेतला? तसेच विभागाचे कामकाज पुढे सुरू राहणार का? याबाबत बार्टी प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी.’’

‘बार्टी’ ही संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था आहे. कौशल्य प्रशिक्षण विभाग हा तिच्या मूळ कार्याचा गाभा आहे. अशा परिस्थितीत, ‘बार्टी’चे प्रशिक्षण कार्यक्रम किंवा उपक्रम महामंडळाकडे वर्ग करणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. कौशल्य प्रशिक्षण योजनेबाबत भूमिका स्पष्ट करून रखडलेला निधी तातडीने वितरित करावा आणि योजना पुन्हा सुरू करावी.
- अशोक वाघमारे, विद्यार्थी

केवळ पदवी मिळवून रोजगार मिळेलच, याची खात्री राहिलेली नाही. त्यामुळे संगणक, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढले आहे. बार्टीच्या प्रशिक्षण योजनांमुळे आम्हाला या क्षेत्रांत पुढे जाण्याची संधी मिळते. मात्र, निधीबाबत स्पष्टता नसल्याने नव्याने प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. सरकारने या योजनांबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
- विशाल गायकवाड, विद्यार्थी

बार्टीच्या कौशल्य विकास योजनेची कामगिरी
प्राप्त निधी : २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांत ४३ कोटी रुपये.
खर्च झालेला निधी : ४१ कोटी ८५ लाख रुपये.
शिल्लक निधी : सुमारे १ कोटी १५ लाख रुपये.
एकूण प्रशिक्षणार्थी : १४ हजार १८९.
नोकरी मिळालेले विद्यार्थी : ४ हजार २२.
स्वयंरोजगार व उद्योजकता : ४ हजार ९०० विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार किंवा उद्योग सुरू केले.
एकूण अभ्यासक्रम : १०४.
२०२५-२६ मधील कामगिरी : एकाच वर्षात सात हजार जणांना प्रशिक्षण.

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

दुष्काळानं कंबरडं मोडलं, त्यात फायनान्सचं लचंड, मणकाबाईंची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

दिल्लीत सहकाऱ्यांना बेड्या पडताच 'प्लान बी'; अभिजीत दीपके इनोव्हा कारने तडक पोहोचले शेतात

R ASHWIN: भुवनेश्वरने टीम इंडियात परतण्यासाठी नेमकं काय केलं? अश्विनने सांगितली महत्त्वाची गोष्ट; मोहम्मद शमीवरही मांडलं मत!

SCROLL FOR NEXT