धर्मग्रंथ वाचा, दान करा
धर्मग्रंथांचे श्रद्धेने वाचन करा. धर्मकार्यासाठी दानधर्म करताना कमाईतील काही भाग सामाजिक कार्यासाठी द्या, असे आवाहन परमपूज्य अक्षयश्रीजी म.सा यांनी केले. भेटवस्तू देण्याऐवजी धर्मग्रंथ व महापुरुषांची चरित्रे भेट देण्याचा संकल्प करा. त्यातून महापुरुषांचे विचार घराघरांत पोचतील आणि अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडेल. संघ, समाज व संस्थांच्या कार्यासाठी सढळ हस्ते मदत करा. महापुरुषांचे प्रेरणादायी विचार विविध माध्यमांतून सर्वांपर्यंत पोचवा. उत्सवांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी तो पैसा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. तन, मन व धनाने सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सहकार्य करा. यामुळे संघटनांना स्थैर्य व आर्थिक बळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
-------------------------------
धर्म हा गुणांचा अखंड खजिना
धर्म हा केवळ कर्मकांड किंवा प्रदर्शन नसून सत्त्व, शांतता आणि समाधी यांचा त्रिवेणी संगम आहे. धर्मात गुणांचा अखंड खजिना आहे, असे प्रतिपादन मुनिश्री प्रशांतरत्न विजयजी यांनी केले.
जोडभावी पेठेतील श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाच्या प्रांगणात सुरू असलेल्या आठ दिवसीय महोत्सवात ते बोलत होते. व्यक्ती पैशावर जितकी श्रद्धा ठेवते, तितकी धर्मावर ठेवत नाही. त्यामुळे पैशासाठी धावपळ होते; मात्र धर्मासाठी प्रयत्न कमी पडतात. पैसा या जन्मात उपयोगी पडतो, तर धर्म जीवनात शांतता आणि जन्मांतरात सुरक्षा देतो. धर्मामुळे तप, त्याग, नियमपालन आणि सत्य स्वीकारण्याचे बळ मिळते. तसेच संघर्ष सहन करण्याची शक्तीही मिळते. कुमारपाळांसारखे महापुरुष संकटांतही धर्मश्रद्धेत स्थिर राहिले. त्यामुळे भगवंतांनी सांगितलेल्या धर्मावर अढळ श्रद्धा ठेवली पाहिजे, असे मुनिश्री प्रशांतरत्न विजय यांनी सांगितले.