सातारा टुडे
............
महायुतीतच चुरशीच्या लढती
पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला; भाजपविरोधात राष्ट्रवादीसह शिवसेनेचे उमेदवार
जिल्हा बॅंक निवडणूक... लोगो
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २२ : जिल्हा परिषदेत राबवलेले ऑपरेशन कमळ यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतही राबवून भाजपच्या नेत्यांनी बॅंक ताब्यात घेण्याचे मनसुबे यशस्वी करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. बिनविरोध झालेल्या नऊ संचालकांमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेच्या एका संचालकाचा समावेश आहे. आता १२ ठिकाणी तुल्यबळ लढत होत असून, सात ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांत, तर तीन ठिकाणी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांत लढत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई हेही रिंगणात असल्याने त्यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी पहिल्यापासून ही बॅंक ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेच वाटचाल केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री गोरे यांनी प्रत्येक मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याचा हेतू साधला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेत महायुतीतच वर्चस्ववाद दिसून येत आहे.
यावेळेस निवडणूक लागलेल्या १२ जागांपैकी सात जागांवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांत लढत आहे. यामध्ये जावळी, कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, औद्योगिक-विणकर व मजूर संस्था, इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गाचा समावेश आहे. भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांत महाबळेश्वर, माण, फलटण या तीन ठिकाणी लढत पाहायला मिळत आहे.
सर्वात अटीतटीची व प्रतिष्ठेची लढत ही माण, पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, जावळी, फलटण या सोसायटी मतदारसंघांत आहे. माणमध्ये खुद्द ग्रामविकासमंत्री गोरे, तर पाटणमधून पालकमंत्री देसाई हे रिंगणात आहेत. या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून आपल्या बाजूचे ठराव करण्यावर भर दिला आहे. माणमध्ये ग्रामविकासमंत्री गोरे यांच्या विरोधात त्यांचे बंधू विद्यमान संचालक व शिवसेनेचे नेते शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजकुमार पोळ हे रिंगणात आहेत. येथे महायुतीतील तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत तिघांसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे. ग्रामविकासमंत्री गोरेंना यावेळेस ही निवडणूक जिंकणे महत्त्वपूर्ण असेल.
पाटणला पालकमंत्री देसाईंच्या विरोधात पारंपरिक विरोधक सत्यजित पाटणकर हे असून, दोघांनीही आपले मतदार सुरक्षित स्थळी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री गोरे आणि देसाई या दोन्ही नेत्यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल. कऱ्हाडला राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील व धनंजय पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे.
कोरेगावात सुनील माने व सुनील खत्री हे दोन मित्रच एकमेकांविरोधात लढत आहेत. आता यावेळेस कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता आहे. खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले व भाजपचे संजीव गाढवे यांच्यात अटीतटीची लढत असून, येथे मंत्री मकरंद पाटील हे अजय भोसलेंच्या पाठीशी ताकद लावणार आहेत; पण शामराव गाढवे हेही रिंगणात असल्याने येथे ५० मतांच्या खेळात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
महाबळेश्वरात विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे अपात्र ठरल्याने त्यांची पत्नी रूपाली राजपुरे रिंगणात असून, त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मोरे उभे आहेत. येथील लढतीत मंत्री मकरंद पाटील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांची सत्त्वपरीक्षा असणार आहे.
जावळीत यावेळेस विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे हे लढत देत असून, जावळीकर यावेळेस माजी आमदार शशिकांत शिंदेंच्या शिलेदाराला साथ देणार की रांजणेंची बाजू घेणार याची उत्सुकता आहे.
......................
चौकट
नाराजांची मदत कोणाला?
...
औद्योगिक विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक चंद्रकांत जाधव यांच्या विरोधात फलटणचे सुनील वाघ हे रिंगणात आहेत. त्यांचा अर्ज मागे घेण्यात अपयश आल्याने आता त्यांना निवडणुकीत शह देण्याची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंवर आहे. मतांची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे; पण उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्यांची मते कोणाच्या बाजूने जाणार यावर येथील गणिते अवलंबून असतील.
..................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.