शिरूर, ता. १६ : शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच, शुक्रवारी (ता. १६) पहाटे आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने मेडिकल व्यावसायिकावर गोळीबार केला. यात ते जखमी झाले. मात्र, छाजेड यांच्या १२ वर्षीय मुलीसह संपूर्ण कुटुंबीयांनी धाडसी प्रतिकार केल्याने चोरट्याला पिस्तूल सोडून पळ काढावा लागला.
उमेश चंदनमल छाजेड (वय ४५, रा. आनंद सोसायटी) असे जखमी व्यावसायिकाचे नाव असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास पाळीव कुत्रा भुंकल्याने जागे झालेले छाजेड घराबाहेर आले. परत घरात शिरताच दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केला. छाजेड यांनी आरडाओरडा करताच वडील चंदनमल, आई लिलाबाई, पत्नी प्रिया व मुलगी मानवी मदतीला धावले.
सर्वांनी मिळून चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली. कुटुंबीयांच्या तावडीतून सुटणे अवघड झाल्यावर चोरट्याने पिस्तूल काढून छाजेड यांच्या डोक्याला लावले. ‘आता जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत त्याने पिस्तुलाचा खटका दाबण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी प्रिया आणि मानवी यांनी त्याच्या हातावर झडप घातली. या झटापटीत चोरट्याने झाडलेली गोळी छाजेड यांच्या डाव्या पायाच्या पोटरीला लागली. त्याने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पिस्तुलातच अडकली. यानंतर आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. घाबरलेल्या चोरट्याने स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळी चोरट्याने गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या शोधासाठी चार पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.
- डॉ. शुभम कुमार, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक
१२ वर्षीय मानवी बनली वडिलांची ढाल
चोरट्यासोबत वडिलांची झटापट सुरू असताना १२ वर्षीय मानवी छाजेड धाडसाने पुढे सरसावली. तिने चोरट्यावर हातापायांनी प्रहार करत वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तिच्या अनपेक्षित आणि आक्रमक प्रतिकारामुळे चोरटा गोंधळून गेला. पळून जाताना मानवी आणि तिच्या आईने त्याचा शर्ट पकडला, मात्र तो हिसका मारून निसटला. यात त्याचा शर्ट छाजेड कुटुंबीयांच्या हातात राहिला आणि चोरटा बनियनवरच पळून गेला.
चोरटा अडीच तासांपासून परिसरात
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हा चोरटा मध्यरात्री अडीच वाजेपासून आनंद सोसायटी परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. त्याने छाजेड यांच्या घरात घुसण्यापूर्वी त्यांच्या घरासमोरील अजित ओस्तवाल यांच्या बंगल्याच्या गॅलरीतून प्रवेश करून तेथील कपाट फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
शिरूर : आनंद सोसायटीत चोरीच्या उद्देशाने गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.