कोपरगाव ः टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड सथ्यनारायण मेहता यांचे संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी स्वागत केले.
---------------------
नवे तंत्रज्ञान, संभाषण कौशल्य आत्मसात करा
सथ्यनारायण मेहता ः ‘संजीवनी’मध्ये ‘दृष्टी टु के २६’
कोपरगाव, ता. २८ ः परदेशी भाषा, नवे तंत्रज्ञान आणि संभाषण कौशल्य आत्मसात करा. ज्ञानाबरोबर व्यावसायिक संबंधही महत्त्वाचे असतात. स्वतःचे मजबूत आणि सकारात्मक नेटवर्क उभे करा. तसे करता आले, तर उज्ज्वल भवितव्य घडण्यास कुठलीही अडचण येणार नाही. संधी तुमची वाट पाहतील मात्र, त्यासाठी पहिल्या दिवसापासूनच या मुद्यांवर मेहनत घ्यायची तयारी ठेवा, असा सल्ला टीसीएस कंपनीचे ग्लोबल हेड सथ्यनारायण मेहता यांनी संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिला.
संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजमधील नवागतांच्या ‘दृष्टी टु के २६’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डायरेक्टर डाॅ. आर. ए. कापगते, विभाग प्रमुख व डीन व्यासपीठावर उपस्थित होते.
मेहता म्हणाले, महाविद्यालयातील पहिला दिवस करिअरची सुरवात गृहीत धरा. त्यामुळे योग्य वृत्ती, शिस्त आणि सातत्याने शिकण्याची सवय अंगीकारता येईल. सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेची जिद्द ठेवा. इंटर्नशिप, प्रोजेक्ट वर्क आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रत्येक संधीचा गांभीर्याने लाभ घ्या. एक चूक दुसऱ्यांदा करू नका.
---------------------
संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजमधील नवागतांचा पहिला दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या नव्या युगात सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्याचे स्वप्न देशासमोर ठेवले. विद्यार्थ्यांनी ही नवी पिढी स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
-अमित कोल्हे, प्रेसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी.