Panchnama Sakal
पुणे

रात्री पार्टी, पहाटे उपरती

‘फरशी पुसत असताना घसरून पडल्याने पाय फॅक्चर झालेल्या मित्राला भेटायला गेलो होतो,’ हेच उशिराचं कारण आपण बायकोला द्यायचं, हे वाक्य मंगेशने दहा ते वीस वेळा पाठ केलं होतं.

सु. ल. खुटवड

‘फरशी पुसत असताना घसरून पडल्याने पाय फॅक्चर झालेल्या मित्राला भेटायला गेलो होतो,’ हेच उशिराचं कारण आपण बायकोला द्यायचं, हे वाक्य मंगेशने दहा ते वीस वेळा पाठ केलं होतं. फरशी पुसण्याचं मुद्दाम सांगायचं कारण हे काम आपल्याही वाट्याला परत यायला नको, अशी त्याची इच्छा होती. मात्र, मित्राचं नाव आणि कारण यात अजिबात गल्लत करायची नाही, असं त्यानं स्वतःला बजावलं. मागच्या वेळी ॲक्सिडेंटचे कारण दिले आणि बोलण्याच्या ओघात तीन-चार मित्रांची नावे घेतली. त्यामुळे ॲक्सिडेंट नक्की कोणाचा झालाय, यात गोंधळ उडाल्याने बायकोने चोरी पकडली होती. त्यामुळे तिने भरपूर झापले होते. आता ती चूक करायची नाही, असं त्याने ठरवलं होतं.

खरं तर बऱ्याच दिवसांनी मंगेशने मित्रांसमवेत पार्टी केली होती. रात्री नऊपर्यंत उरकायचं, असं ठरवूनही रात्रीचा एक वाजला होता. त्यामुळे बायकोच्या आठवणीने त्याच्या अंगावर काटा आला होता. तरीपण आपलं अभिनय कौशल्य पणाला लावून, थापेबाजी यशस्वी होईल, असा त्याला विश्‍वास होता. घराजवळ येताच अडखळणारी पावले त्याने सावरली. घसा खाकरून स्पष्ट आणि सरळ बोलण्याचा त्याने सराव केला. मग त्याने हळूच बेल वाजवली. पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने परत तीन-चार वेळा बेल वाजवली. नंतर ‘मंजूषा’, ‘मंजूषा’ असा आवाजही दिला. मात्र, आतून कसलीही हालचाल न झाल्याने तो घाबरला. ‘अगं खरंच मित्राचा ॲक्सिडेंट झालाय. गाडी चालवत असताना, ‘फरशीवरून’ तो पडलाय. त्यामुळे ‘कान’ फ्रॅक्चर झालाय,’ असं त्याने पाच-सहा वेळा धुंदीतच सांगितलं. मात्र, दार न उघडल्याने बायकोने आपला डाव ओळखला असून, ती आपल्यावर रागावली आहे, याची जाणीव त्याला झाली. मग मात्र त्याने सरळ शरणागती पत्करली.

‘बायको, मला माफ कर. मी परत कधीच पार्टी करणार नाही. मी परत ‘पाण्याच्या’ थेंबालाही स्पर्श करणार नाही. मला घरात घे.’ असं त्याने दहा-पंधरा वेळा म्हटलं. मात्र, दार उघडत नसल्याने त्याची बेचैनी वाढत चालली. शेवटी कंटाळून तो रस्त्यावर आला. पहाटे सहापर्यंत तो भटकत राहिला. तेवढ्यात एका पोलिसाने त्याला अडवले. ‘एवढ्या पहाटे कोठे हिंडतोस? चोर तर नाहीस ना?’ असे खडसावले.

‘साहेब, बायको घरात घेत नाही. तुम्ही तिला समजावून सांगता का? मी तुमच्याबरोबर बंदोबस्ताला होतो, असं सांगा. चांगलं खडसावा. नवऱ्याला घरात न घेणं चांगलं आहे का?’ मंगेशने आपली कैफियत मांडली.

‘आता नवरा-बायकोची भांडणंही आम्ही सोडवायची का? संचारबंदी लागू आहे, हे तुला माहिती नाही का?’ पोलिसाने दमात घेतलं. ‘साहेब, मला माहिती आहे. पण बायकोला ते माहिती नाही ना?’ मंगेशने म्हटलं.

‘ते काही सांगू नकोस. आधी पाचशे रुपये दंड भर.’ पोलिसाने म्हटले.

‘साहेब, एक हजार रुपये देतो; पण नवऱ्याला परत त्रास द्यायचा नाही, असं माझ्या बायकोला एकदा दम द्या,’ असे म्हणून मंगेशने पैसे देण्यासाठी पाकीट काढलं आणि त्याला मोठा धक्का बसला. पाकिटात घराची चावी होती व बायको दुपारीच माहेरी गेली होती, हे लक्षात आल्याने त्याचा चेहरा आनंदाने फुलला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT