PNE26W61536
--------------
‘नेटवर्क’अभावी थांबली रोव्हर मशिनद्वारे मोजणी
कोर्स स्टेशन बंद; सॅटेलाईट इमेजला अडथळा; मोजणीसाठी काही दिवसांचा थांबा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : जमिनीची किंवा जागांची मोजणी लवकर व्हावी म्हणून भूमी अभिलेख कार्यालयांना रोव्हर मशिन देण्यात आल्या आहेत. सॅटेलाईट इमेजद्वारे मोजणीधारकाचे क्षेत्र अचूक मोजून हद्द-खुणा करून दिल्या जातात. मात्र, सध्या रोव्हर मशिनद्वारे मोजणीवेळी नेटवर्कचा अडथळा असल्याने सॅटेलाईट इमेज दाखवत नाहीत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ३००० जणांच्या मोजणी थांबल्याचे ‘भूमी अभिलेख’मधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातून दरमहा तब्बल १६०० ते १७०० शेतकरी, जागा मालक क्षेत्राच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करीत आहेत. यात अनेकांची बांधावरून भांडणे सुरू असतात, जमिनीत अतिक्रमण केल्याचे विषय असतात. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगूनही तोडगा निघत नाही. अशावेळी वाद वाढून भांडण पोलिस ठाण्यात जाऊ नये म्हणून शेतकरी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज करतो. मोजणी लवकर व्हावी म्हणून अनेकजण भूमी अभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे घालतात. त्यावेळी त्यांना ८-१० दिवस थांबावे लागेल, अशी उत्तरे मिळतात. मात्र, आता शासकीय पातळीवरील अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अर्ज करून, मोजणीची तारीख येऊन देखील थांबावे लागत आहे. अनेकांना मोजणीची तारीख मिळाल्याने त्या दिवशीच्या पोलिस संरक्षणाचे पैसे भरले, पण मोजणी लांबणीवर पडल्याने त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा बंदोबस्तासाठी पोलिसांकडे जावे लागत आहे.
---
चौकट
कोर्स काय आहे?
‘कोर्स’ हे भारताच्या सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे चालवले जाणारे एक सॅटेलाईट नेटवर्क आहे, जे अचूक मॅपिंग आणि भौगोलिक सर्वेक्षणासाठी जीपीएस डेटा पुरवते. अनेकदा सर्व्हे ऑफ इंडियाच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड किंवा मेंटेनन्सचे काम सुरू असल्यामुळे काही काळासाठी ‘कोर्स’ स्टेशन्सचा डेटा मिळणे किंवा लॉग-इन होणे बंद होते. आता असाच अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जमिनींच्या मोजणी थांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
कोट
‘कोर्स’च्या सर्व्हरमध्ये काही अडथळा असल्याने सॅटेलाईट नेटवर्क मिळत नव्हते. त्यामुळे मोजणीची प्रकरणे थांबली होती. आता सर्व्हर सुरू झाल्याने मोजणीच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होईल.
- मुगुटराव मगर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.