सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१५ ः केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या अठरा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती चांगलीच ढासळली असून आज दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला १६ जुलै रोजी सकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे साडेआठ किलो वजन कमी झाल्यामुळे वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्याची आणि वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते व वकील राकेशकुमार सैनी यांनी दाखल केली आहे. विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित मुद्यांवर मोदी सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी, अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
‘‘शांततापूर्ण उपोषणाद्वारे विरोध करणे हा अधिकार असला तरी उपोषणकर्त्याचा जीव धोक्यात आल्यास सरकार गप्प राहू शकत नाही. वांगचुक यांच्या बाबतीत काही अघटित घडल्यास देशासाठी तसेच जगासाठी ती अतिशय लाजीरवाणी गोष्ट ठरेल,’’असे या याचिकेत म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय आणि तेजस करिया यांच्या खंडपीठाने आज या याचिकेवर सुनावणी करून केंद्र तसेच दिल्ली सरकारला नोटिस बजावली असून त्यावर गुरुवारी उत्तर मागितले आहे.
शशी थरुर यांचे आवाहन
वांगचुक यांच्या उपोषणाने देशाच्या अंतरात्म्याला साद घातली असून त्यांनी पुढची दीर्घ लढाई लढण्यासाठी उपोषण संपवावे, असे आवाहन काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव तसेच शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष, शिवसेना (यूबीटी), तृणमूल काँग्रेस आणि अन्य पक्षांनी जाहीर समर्थन दिले असले तरी काँग्रेस पक्षाने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थही भूमिका घेतलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मुद्यांवरून देशभरात सर्वत्र आंदोलन करीत असलेल्या काँग्रेसला कॉक्रोच जनता पार्टी तसेच वांगचुक हे मोदी सरकारचे छुपे समर्थक असल्याचा संशय असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.