पुणे

बटाट्याचे पदार्थ - सुप्रिया खासनीस

CD

बटाटाविशेष
स्वयंपाकाचा राजा
- सुप्रिया खासनीस
-------------------------------------------

बटाटा चिप्सची भाजी

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : चार ते सहा लांबट आकाराचे बटाटे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ व साखर, गरजेनुसार तेल, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : प्रथम कच्चे बटाटे सोलून चिप्ससारखे किसून घ्यावेत व स्वच्छ धुवून थोड्या तेलावर वाफवून घ्यावेत. जास्त शिजवू नये. चिप्स थोडे गार झाल्यानंतर तेलात तांबूस रंगावर तळावेत. आता कढईत तेल घालून त्यात हळद, हिंग, मोहरी घालून त्यात तळलेले बटाट्याचे चिप्स घालावेत. त्यात तिखट, मीठ व साखर घालून चांगले परतावे. परतल्यानंतर त्यात खोबऱ्याचा कीस व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावे. बटाटा चिप्सची भाजी तयार.

००००

मसालेदार बटाटा

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो बटाटे, २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ, २ चमचे ओल्या खोबऱ्याचा कीस, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, २ चमचे गोडा मसाला किंवा गरम मसाला, थोडा गूळ व चिंच, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल.

कृती : प्रथम बटाटे उकडून व सोलून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कढईत चमचे तेल घालून त्यात हळद, हिंग, मोहरी घालावी. फोडणीत चिरलेला कांदा घालून लालसर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात बटाट्याच्या फोडी परताव्या. परतल्यानंतर त्यात तिखट, मीठ, गरम किंवा गोडा मसाला, गूळ व चिंच घालून भाजी नीट एकजीव करावी आणि मंद आचेवर शिजू द्यावी. एक वाफ आल्यानंतर पुरेसे पाणी घालून रस्सा दाट होईपर्यंत भाजी शिजवावी.

००००

आलू मटार

वाढप - ४ ते ६ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो सोललेले मटार दाणे, १ मोठा बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, २ बटाटे, २ चमचे तिखट, चवीनुसार मीठ, किंचित साखर, ६ ते ७ कढीपत्त्याची पाने, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, २ चमचे गरम मसाला, अर्धा वाटी आले-लसूण-सुके खोबरे-कांदा यांचे वाटण, गरजेनुसार तेल.

कृती : प्रथम बटाट्यांची साले काढून चिरून घ्यावेत. कढईत तेल घालून त्यात कढीपत्ता, हळद, हिंग, मोहरी घालावी. त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मग त्यात चिरलेला टोमॅटो परतावा. नंतर गरम मसाला घालून आले-लसूण-सुके खोबरे-कांदा यांचे वाटण चांगले परतावे. मिश्रणाला तेल सुटायला लागले, की त्यात बटाटे व मटार घालावेत व थोडी वाफ आणावी. वाफ आल्यानंतर पुरेसे पाणी घालून शिजू द्यावे. शिजल्यानंतर गॅस बंद करावा. भाजी वाढतेवेळी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

००००

दम आलू

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो अगदी छोट्या आकाराचे बटाटे, २ मध्यम आकाराचे किसलेले कांदे, १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो, १ चमचा लाल तिखट, २ चमचे गरम मसाला, प्रत्येकी पाव चमचा जिरे व हळद, २ ते ३ तमालपत्र, ४ ते ५ लसूण पाकळ्या, थोडे आले, पाव वाटी बेताचे आंबट दही, गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम बटाटे जरासे उकडून घ्यावे. फार उकडू नये. बटाटे गार झाल्यानंतर सोलून घ्यावेत. सोललेल्या बटाट्यांना काटे चमच्याने मोरावळ्याला मारतो त्याप्रमाणे थोडे टोचे मारावेत. कढईत तेल तापवून त्यात उकडलेले बटाटे खमंग तळून घ्यावेत व एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. बटाटे तळून उरलेल्या तेलात (तेल जास्त वाटत असेल, तर थोडे कमी करावे) जिरे व तमालपत्र घालावे. त्यात कांदा घालून तो गुलाबी रंगावर परतावा. मग त्यात गरम मसाला, तिखट, हळद, आले व लसूण पेस्ट घालून परतावे. चांगले परतल्यानंतर त्यात दही घालून घोटावे. दह्याच्या गुठळ्या होऊ देऊ नये. दही चांगले घोटले, की तेल वेगळे होते. नंतर त्यात टोमॅटो व मीठ घालून चांगले परतावे. मग तळलेले बटाटे घालावेत. सर्व मसाला बटाट्यांना लागेल असे परतावे. भाजीत दीड ते दोन वाट्या गरम पाणी घालून भाजीला चांगली वाफ आणावी. वाफेमुळे मसाला व मीठ बटाट्यात चांगले मुरते. गॅस बंद करावा. दम आलू सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

००००

बटाट्याची आमटी

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : एक वाटी तुरीचे वरण, अर्धी वाटी बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी, २ हिरव्या मिरच्या, ६ ते ७ कढीपत्त्याची पाने, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, चवीनुसार तिखट व मीठ, १ चमचा चिंचेचा कोळ, थोडा गूळ, १ चमचा किसलेले सुके खोबरे, १ चमचा गोडा मसाला, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल.

कृती : प्रथम किसलेले सुके खोबरे जरासे भाजून घ्यावे. कढईत तेल घालून हळद, हिंग व मोहरीची फोडणी करावी. त्यात कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्यांचे तुकडे व सुके खोबरे घालून परतावे. मग चिरलेले बटाटे घालून पुन्हा चांगले परतावे. या मिश्रणाला थोडी वाफ आणावी. बटाटे शिजत आले, की त्यात तुरीचे वरण, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून पुन्हा शिजवावे. गरजेनुसार दीड ते दोन वाट्या पाणी घालून आमटी उकळू द्यावी. आमटीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

००००

चोचवलेल्या बटाट्याची भाजी

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो लांबट आकाराचे बटाटे, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, गरजेनुसार तेल.

कृती : प्रथम बटाट्याची साले काढून घ्यावीत. नंतर काकडी चोचवतो त्याप्रमाणे बटाटे बारीक चोचवून घ्यावेत. चोचवलेले बटाटे स्वच्छ धुवून घ्यावेत. कढईत तेल घालून त्यात हळद, हिंग व मोहरी घालावी. मग हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. त्यानंतर चोचवलेले बटाटे व मीठ घालून पुन्हा चांगले परतावे. भाजीवर झाकण ठेवून चांगली वाफ आणावी व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

००००

आलू पालक

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : अर्धी जुडी पालक, २ बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा आले व लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, गरजेनुसार तेल व पाणी.

कृती : प्रथम पालक स्वच्छ धुवून, चिरून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावा. बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करावे. कढईत तेल घालून त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट व हिरव्या मिरच्या परताव्यात. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यावा. मग गरम मसाला व थोडे पाणी घालून बटाटा चांगला शिजेपर्यंत परतावे. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. नंतर वाटलेला पालक, मीठ व गरजेनुसार पाणी घालून पुन्हा शिजवावे. शिजल्यानंतर गॅस बंद करावा व भाजी सर्व्ह करावी.

००००

बटाटे, वांगे व हरभरे यांची शाक भाजी

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो बटाटे, अर्धी वाटी शिजलेले हरभरे, १ वांगे, २ चमचे गरम मसाला, १ चमचा तिखट, पाव वाटी कांदा-लसूण-सुके खोबरे-आले यांचे वाटण, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, गरजेनुसार तेल, चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम बटाटे व वांगे यांच्या फोडी करून स्वच्छ धुवून घ्याव्यात. कढईत तेल घालून त्यात हळद, हिंग व मोहरी घालावी. यात कांदा-लसूण-खोबरे-आले यांचे वाटण घालावे. या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतावे. तेल सुटायला लागल्यानंतर त्यात गरम मसाला, तिखट, बटाटे व वांग्याचे काप, शिजवलेले हरभरे घालून चांगले परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. मग त्यात गरजेनुसार गरम पाणी घालावे व पुन्हा शिजवावे. गरम पाण्यामुळे भाजीला मसाल्याचा चांगला रंग येतो. आवडीनुसार रस्सा पातळ किंवा दाट ठेवावा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

००००

बटाटा-कांदा रस्सा भाजी

वाढप - ४ व्यक्तींसाठी

साहित्य : पाव किलो बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे गरम मसाला, प्रत्येकी पाव चमचा हळद, हिंग व मोहरी, गरजेनुसार तेल व पाणी, चवीनुसार मीठ, १ चमचा तिखट, पाव वाटी दाण्याचा कूट, थोडा गूळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : प्रथम बटाट्यांची साले काढून त्यांच्या फोडी करून स्वच्छ धुवून घ्याव्यात. कढईत तेल घालून हळद, हिंग व मोहरी घालावी. मग यात कांदा परतून घ्यावा. त्यानंतर गरम मसाला, तिखट व मीठ घालून चांगले परतावे. गरजेनुसार गरम पाणी घालावे. भाजी थोडी शिजत आल्यानंतर त्यात दाण्याचा कूट व गूळ घालावा. भाजीवर झाकण ठेवून शिजवावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बटाटा-कांदा रस्सा भाजी सर्व्ह करावी.

-----------------------------------------

सुप्रिया खासनीस चिंचवडस्थित फूड ब्लॉगर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार? 48 तासांत 3 मोठे निर्णय, 'आरबीआय'नेही दिला इशारा, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

प्रत्येक रंगाची एक किंमत आहे: हिंदी ZEE5 ने लॉन्च केला ‘सतरंगी- बदले का खेल’चा ट्रेलर

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT