लोणी काळभोर, ता. २४ : दसरा सणासाठी कुटुंब मूळ गावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बंद घराचे कुलूप तोडून २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये १२ हजारांची रोकड, १० हजारांचा गल्ला आणि चांदीच्या पैंजणांचा समावेश आहे.
याप्रकरणी गणेश नामदेव पवार (वय ४३, रा. मोरया पार्क, काळे पेट्रोल पंपामागे, कुंजीरवाडी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे १७ ऑक्टोबरला सकाळी पत्नी सुप्रिया आणि मुलगा बालाजी यांच्यासह दसरा सणानिमित्त मूळ गावी पळसदेव (ता. इंदापूर) येथे गेले होते. घराला कुलूप लावून ते गावी गेले असताना, दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी राहणाऱ्या महिलेला घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने पवार यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.
पवार यांनी घरी येऊन पाहणी केली असता, दरवाजाची कडी तुटलेली आणि बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील १२ हजार रुपयांची रोकड, सुमारे १० हजार रुपये असलेला गल्ला आणि एक हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघड झाले. लोणी काळभोर पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.