लोणी काळभोर, ता. २१ : येथील कन्या प्रशालेने २६व्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश रीड फेस्ट’ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. इंग्रजी साहित्याचा इतिहास आणि नाट्यपरंपरेतील बदलांच्या कल्पक सादरीकरणामुळे विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश मिळवले.
लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात ७ ते १० ऑक्टोबरदरम्यान २६वी आंतरराष्ट्रीय आणि ५६वी वार्षिक ईएलटीएआय परिषद आयोजित करण्यात आली होती. इंग्रजी साहित्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांसह अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. दररोज सुमारे ३० स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मध्ययुगीन कालखंडापासून आधुनिक काळापर्यंतचा इंग्रजी नाटकाचा प्रवास प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला. या सादरीकरणात इयत्ता नववीतील सई गिरी, सुप्रिया चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, श्रद्धा माने, पौर्णिमा लोमटे, वैभवी तावरे, समीक्षा कुंभार आणि श्रेया येवतीकर या आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना सहशिक्षिका वर्षाराणी पाटील यांनी मार्गदर्शन, तर अश्विनी मोकाशी यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापिका सुजाता भालेराव यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.