पुणे, ता. १९ ः विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात ५५ ठिकाणी ७१ पथसंचलने होणार आहेत. त्यात ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत. त्यात बालस्वयंसेवकांची १३ पथसंचलने आहेत. संघाच्या शताब्दीनिमित्त देशभरात शाखा विस्तार अभियान पार पडले आहे. या पार्श्वभूमीवर हे संचलन होत आहे.
विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन म्हणूनही साजरा केला जातो. नागपूर येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रपूजन होते. या वर्षी दैनिक जागरणचे ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. देशभरात नगर व तालुका स्तरावर पथसंचलन, शस्त्रपूजन उत्सवांचे आयोजन केले जाते. पुण्यातील बहुतांश पथसंचलने मंगळवारी (ता. २०) होतील. या शिस्तबद्ध संचलनासोबतच शस्त्रपूजन उत्सवात शारीरिक प्रात्यक्षिके, बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या वेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
गोखलेनगर येथील शस्त्रपूजन उत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मनमोहन वैद्य यांचे व्याख्यान आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेट क्रमांक चारच्या मैदानावरून मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पथसंचलनाला सुरुवात होईल, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता पथसंचलन होईल. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातही तालुका किंवा नगर स्तरावर पथसंचलने, शस्त्रपूजन उत्सव होणार आहेत.
स्वागताची तयारी
शहरात विविध ठिकाणी पथसंचलनाच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत, तसेच चौकांमध्ये संचलन मार्गावर रांगोळी काढून स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव होईल. समाजातील सर्व स्तरांतील नागरिक या पथसंचलनाचे स्वागत दरवर्षी उत्साहाने करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.