महिला मतदार संघात सात उमेदवार रिंगणात
चढा-ओढीच्या राजकारणाची झाली ‘खिचडी’
लोगो : अहिल्यानगर जिल्हा बॅंक निवडणूक
सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले विखे-थोरात एकत्र आले. दिग्गज नेत्यांनी आपापल्या जागा बिनविरोध केल्या. मात्र, दहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव मतदार संघात दोन जागांसाठी हर्षदा काकडे, गुंड, नागवडेसह सर्वाधिक सात उमेदवार महिला रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदार संघानेच सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. आतापर्यत विखे-थोरात गटाचे १०, तर राम शिंदे गटाचा एक असे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे आताच बॅंकेवर थोरात-विखे गटाचे बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, राहिलेल्या दहा जागांवरही या मंडळींनी लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत बुधवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता होती. मात्र गुरुवारी (ता. २२) दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत उमेदवारांची यादी दिली. एकूण २७ उमेदवार सध्या १० जागांसाठी लढत आहेत.
या निवडणुकीत गट-तट आणि विविध पक्षांची नेत्यांनी सगळी खिचडी करून ठेवली आहे. आपापल्या सोयीने सर्व एकत्र आले आहेत. थोरात-विखे यांचा एक गट असून नीलेश लंके, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा एक गट आहे. राम शिंदे यांचा स्वतंत्र गट आहे. एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेचा गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहे. भाजपचेही काही नेते शरद पवारांच्या गटाबरोबर आहेत. उद्धव ठाकरे सेनेचा एक गट थोरात-विखे, भाजपसोबत आहे.
दहा जागांत दोन महिला राखीव हा महत्त्वाचा मतदारसंघ असून येथे दोन जागा निवडायच्या आहेत. या मतदार संघात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजूषा गुंड, माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व शिवसेना (शिंदे) नेत्या हर्षदा काकडे, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे, संगीता वाघ, पुष्पा गायकवाड यांच्यात लढत होत आहे. जिल्हा परिषदेत सोबत काम केलेल्या तीन महिला पदाधिकारी एकमेकींच्या विरोधात आहेत. शिवसेना नेत्या हर्षदा काकडे काकडे म्हणाल्या, आम्ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यासाठी काम करतोय. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची आहे. या बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक न्याय देण्यासाठी लढा देत आहे. त्यामुळे बॅंकेत संधी हवी आहे. लोकांची पसंती असल्याने मोठ्या फरकाने जिंकणार आहे. सर्व उमेदवार आता थेट मतदारांच्या भेटीला पोचले आहे. त्या-त्या तालुक्यात आपापल्या संपर्कातून मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी संघर्ष सुरु आहे. २७ पैकी ९ महिला रिंगणात आहेत.
------चौकट-----
अशा आहेत लढती
- सोसायटी मतदारसंघ - अकोले : आमदार किरण लहामटे व संजीवनी शिंदे, कर्जत : तुषार पिसाळ व ज्योती शिंदे, खासदार नीलेश लंके व राहुल शिंदे, राहुरी : सत्यजित कदम व आमदार प्राजक्त तनपुरे,
- शेतीपूरक व शेतीमाल प्रक्रिया व पणन मतदारसंघ : आमदार आशुतोष काळे व सुधीर म्हस्के,
- महिला राखीव मतदारसंघ (दोन जागा) : माजी सभापती हर्षदा काकडे, संध्या महांडुळे, अनुराधा नागवडे, संगीता वाघ, मंजूषा गुंड, सुवर्णा पाचपुते व पुष्पा गायकवाड.
- अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघ : माजी आमदार वैभव पिचड व प्रशांत लोखंडे,
- इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघ : शिवदास गुंजाळ, कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, कडुचंद शेटे, आजिनाथ हजारे,
- विमुक्त जाती, भटक्या जमाती राखीव मतदारसंघ : सुभाष गिते, गणपतराव सांगळे, हृषीकेश ढाकणे
--------
चौकट
म्हणून निवडणूक घ्यावी लागल्याची चर्चा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संबंधित आमदार, नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व खासदार नीलेश लंके यांनी बॅंकेवर संचालक म्हणून जाण्याची तयारी केली. हेच विखे-थोरात गटाला नको होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवसांपर्यंत याबाबत मॅरेथॉन बैठका झाल्या. ‘लंके नको’ याच मुद्द्यावर नेते अडून राहिल्याने अखेर काही जागांवर निवडणूक घेण्याची वेळ आली अशी चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चिली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.