महिला शेतकरी
प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा
शेतजमीन महिलेच्या नावे असण्याची अट नाही; ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली असून, प्रमाणपत्रासाठी महिलेच्या नावे शेती असण्याची गरज नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा २०२६ मधील कलम ५(१) व ६(१) अन्वये महिला शेतकरी म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया कृषी विभागाच्या यंत्रणेने सुरू केली आहे. तसेच, महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासदेखील सुरुवात करण्यात आली आहे. संगणक संच असलेली शेतकरी महिला थेट आपल्या घरातून, तर संगणक संच नसलेली महिला गावातील सार्वजनिक सेवा केंद्रातून (सीएससी) अर्ज दाखल करू शकते. ‘शेती किंवा शेतीशी निगडित काम करणाऱ्या कोणत्याही महिलेला प्रमाणपत्र मिळू शकते. जमीन कोणाच्याही नावावर असली, तरी ‘महिला शेतकरी’ प्रमाणपत्र देण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच, महिलांसाठी शेतीची व्याख्यादेखील बदलण्यात आली आहे. त्यामुळे १७ प्रकारच्या कामांपैकी कोणतेही काम करणारी महिला यापुढे शेतकरी महिला म्हणून ओळखली जाईल,’ असे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रमाणपत्रासाठी महिलेचे किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. महिलेने प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज ग्रामसभा किंवा नगरपंचायतीच्या बैठकीसमोर ठेवला जाणार आहे. अर्जावर ग्रामसभेला मंजुरी किंवा नकाराचा ठराव करावा लागेल. मात्र, नकार असल्यास त्याचे कारण सात दिवसांच्या आत संबंधित महिलेला कळवावे लागणार आहे. तसेच, ठराव मंजूर झाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत संबंधित महिलेला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जात असल्यास ग्रामसभेच्या निकालानंतर चार महिन्यांच्या आत अशा महिलेला अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागावी लागेल. तसा अर्ज दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला एका महिन्यात निकाल द्यावा लागेल, असे बंधन कायद्यानेच सरकारी यंत्रणेला घालून दिले आहे.
प्रमाणपत्रासाठी येथे करा अर्ज
https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/apply/ या संकेतस्थळावर राज्यातील महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जातीचा प्रवर्ग विचारला जातो. त्यानंतर शेतीमधील कामाचा प्रकार निवडावा लागतो. त्यानंतर अर्ज सादर करता येतो. तसेच, सादर केलेल्या अर्जाची स्थितीदेखील https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/status/ या संकेतस्थळावर जाणून घेता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.