महिला शेतकरी प्रमाणपत्रांत
अकोला तालुका विभागात आघाडीवर
२९ हजार ७४८ प्रमाणपत्रे डाउनलोड; महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र मोहिमेत अमरावती विभागात अकोला तालुक्याने आघाडी घेतली आहे. मंगळवार (ता. १३) पर्यंत तालुक्यातील २९ हजार ७४८ महिलांची प्रमाणपत्रे डाऊनलोड करण्यात आली आहेत. जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, तेथे दोन लाख ८५ हजार २६९ प्रमाणपत्रे डाऊनलोड झाली आहेत.
राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे, शेतजमीन महिलेच्या स्वतःच्या नावावर असणे अनिवार्य नाही. पतीच्या नावावर जमीन असली, तरी शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलेला पात्रतेनुसार प्रमाणपत्र मिळू शकते.
पीक उत्पादन, बियाणे उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, कुक्कुटपालन आणि शेतीमाल प्रक्रिया अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या १८ वर्षांवरील महिलांना या प्रमाणपत्रासाठी पात्रतेनुसार अर्ज करता येतो. प्रमाणपत्रामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळण्यासोबतच पीककर्ज, पीकविमा, कृषी अनुदान, कृषी निविष्ठा आणि प्रशिक्षणासारख्या सुविधांसाठी पात्रता सिद्ध करण्यास मदत होणार आहे. मात्र, संबंधित योजनांचे लाभ त्यांच्या स्वतंत्र निकषांनुसार मिळतील. महिलांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, यासाठी कृषी विभागाकडून गावोगावी जनजागृती केली जात आहे.
तालुकानिहाय प्रमाणपत्र डाऊनलोड
अकोला – २९७४८
अकोट – १७१८१
तेल्हारा – १५९१३
बाळापूर – १५२६३
बार्शीटाकळी – १४८४८
मूर्तिजापूर – १४६०२
पातूर-१३९७५
प्रतिक्रीया....
महिला शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी गावोगावी सहायक कृषी अधिकाऱ्यांमार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास वेग आला. ज्या महिलांचे प्रमाणपत्र अद्याप राहलेले आहे, त्यांनी तातडीने महाराष्ट्र कृषी विभागाच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. मंजुरीनंतर नियमानुसार प्रमाणपत्र दिले जाते.
- प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी, अकोला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.