Grandmother and father killed young girl for secret money Dhebewadi satara 
सातारा

गुप्तधनासाठी आजीनेच घेतला बळी

भाग्यश्री मानेच्या खुनात वडिलांचाही सहभाग; ३ मांत्रिकांसह चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

सातारा - ढेबेवाडी विभागातील करपेवाडी (ता. पाटण) येथील महाविद्यालयीन युवतीचा गळा चिरून झालेल्या हत्येच्या तब्बल सुमारे साडेतीन वर्षांनी उलगडा झाला आहे. गुप्तधनप्राप्ती व घराची भरभराट होण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून आजी व वडिलांनी युवतीचा नरबळी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन मांत्रिकांसह चौघांना अटक करण्यात आली असून, आणखी एकाचा पोलिस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे गळा चिरताना स्वत: मुलीच्या आजीने युवतीचे पाय धरल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे.

गळा चिरणारा मांत्रिक फुलसिंग सेवू राठोड, मांत्रिक व चालक विकास ऊर्फ विक्रम तोळाराम राठोड (रा. नऱ्हेगाव, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. मुळे तांडा, ता. दक्षिण सोलापूर) व मुलीची आजी (आईची आई) रंजना लक्ष्मण साळुंखे (रा. तळमावले, ता. पाटण) व स्थानिक देवऋषीन कमल आनंदा महापुरे (रा. खळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यामध्ये मुलीच्या वडिलांना आधीच अटक करण्यात आली होती; परंतु तेव्हा सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्याला जामीन मंजूर झालेला आहे.

करपेवाडीच्या शिवारात २२ जानेवारी २०१९ रोजी भाग्यश्री संतोष माने (वय १७) या मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता. भाग्यश्री ही तळमावले येथील महाविद्यालयात शिकत होती. त्या दिवशी सकाळी कॉलेजमधून परीक्षेचे रिसीट आणायला जाते, असे सांगून ती घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार विविध पातळ्यांवर पोलिसांनी तपास केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे ३५ ठिकाणी तपास केला. सव्वाशेहून अधिक जणांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थिनी, मैत्रिणी, मांत्रिक आदींचा समावेश होता. संशयाची सुई भाग्यश्रीच्या कुटुंबीयांभोवती फिरत असल्याने त्या वेळी तिच्या वडिलांना अटकही केली गेली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटकाही झाली.

दरम्यान, गुन्ह्यांवर नेमकेपणाने प्रकाश पडावा, यासाठी पोलिसांनी वडिलांची ब्रेनमॅपिंग चाचणीही केली होती. त्यामध्ये काही मुद्दे पोलिसांच्या हाताला लागले होते. त्यामुळे गेले तीन वर्ष पोलिसांनी या गुन्ह्याचा माग सोडला नव्हता. नंतरच्या काळात पोलिस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी या आव्हानात्मक प्रकरणाचा पुन्हा कसून तपास सुरू ठेवला होता. त्यातून गुन्ह्याच्या वेळी विक्रम व कमल हे परिसरात असल्याची माहिती पोलिसांच्या हाताला लागली. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे या चौकशीत मोठी भूमिका बजावली. त्यामुळे संशयितांनी गुप्तधनाच्या आमिषाने मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलीच्या आजीसोबत उसाच्या शेतात गुंगीचे औषध देऊन गळा चिरून भाग्यश्रीचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. मुलीचे वडील जामिनावर असले, तरी ते ही या गुन्ह्यात संशयित राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एक संशयित निष्पन्न झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत. गुन्ह्यामध्ये आणखी संशयित वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पाटणचे उपअधीक्षक विवेक लावंड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार साबीर मुल्ला, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संकेत निकम, दीपाली यादव, शकुंतला सणस, यशोमती काकडे, प्रशांत चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर यांनी ही कारवाई केली. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वाचा असणारा हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल अधीक्षक बन्सल यांनी पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

आजीने धरले होते पाय

गुप्तधनाच्या व घरातील वातावरण चांगले होण्याच्या आमिषाने भाग्यश्रीचा नरबळी देण्याच्या प्रक्रियेत आजीनेच पुढाकार घेतला होता. घटनेदिवशी ती तिच्या घरी होती. तेथून आजोळी जाऊया, असे सांगून तिनेच तिला घटनास्थळी आणले. त्यानंतर गळा चिरण्याची कृती होत असताना गुंगीचे औषध दिल्यानंतर आजीने व देवऋषीनीने तिचे पाय धरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT