लाच प्रकरणात
भुसावळला दोघांना अटक
-----------
शेतमोजणीसाठी मागितले दोन हजार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १६ : शेतजमिनीच्या मोजणीसाठी केलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी व सायबर कॅफेचालकाला अटक केली. सचिन किसन पाटील (वय ४५) व राकेश रामदास चव्हाण (४३, सायबर कॅफेचालक) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.
तक्रारदार भुसावळ तालुक्यातील शिवारातील शेतजमिनीचे मालक आहेत. शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी त्यांनी ५ सप्टेंबरला भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेतून ऑनलाइन अर्ज केला होता. या अर्जासाठी त्यांनी दोन हजार रुपये शुल्क भरले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरला तक्रारदारांनी मोजणी प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत चौकशी केली. या वेळी सायबर कॅफेचालक राकेश चव्हाण यांनी भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी (शिपाई) सचिन पाटील यांच्यासोबत बोलणे झाले असून, त्यांचे काम करून मिळेल, असे सांगितले. नंतर तक्रारदाराने शेतमोजणीच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत पुन्हा संपर्क साधला. त्यावेळी चव्हाण यांनी लोकसेवक सचिन पाटील यांच्या माध्यमातून काम करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १६ ऑक्टोबरला तक्रारीची पडताळणी केली. त्यात तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ‘एसीबी’ने सापळा रचला. राकेश चव्हाण यांनी तक्रारदाराला दोन हजार रुपये देण्यास प्रवृत्त केले, तर सचिन पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक हेमंत नागरे, उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी किशोर महाजन, मनोज पाटील व प्रणेश ठाकूर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.