धुळे : टुडे पान १ साठी..
--
प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी १० हजार अनुदान
--
रब्बी ज्वारी, हरभरा व मसूर उत्पादकांना महाडीबीटीवर संधी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षात रब्बी ज्वारी, हरभरा आणि मसूर पिकांचे प्रमाणित बियाणे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून थेट अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये रब्बी ज्वारीसाठी हेक्टरी सात हजार ५०० रुपये, तर हरभरा आणि मसूर पिकासाठी हेक्टरी १० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. पात्र शेतकरी तसेच शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी केले आहे.
रब्बी ज्वारीच्या पायाभूत बियाण्यांपासून प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी सात हजार ५०० रुपये अनुदान दिले जाईल. तसेच बियाणे वितरणासाठी १० वर्षांच्या आतील वाणांना प्रतिक्विंटल तीन हजार रुपये आणि १० वर्षांवरील वाणांना प्रतिक्विंटल एक हजार ५०० रुपये अनुदान मिळेल. हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. याच्या वितरणासाठी पाच वर्षांच्या आतील वाणांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये, तर पाच ते १० वर्षांपर्यंतच्या वाणांना प्रतिक्विंटल चार हजार रुपये अनुदान देण्यात येईल. मसूर पिकासाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये उत्पादन अनुदान असून, वितरणासाठी पाच वर्षांखालील वाणांना प्रतिक्विंटल १२ हजार रुपये व पाच ते १० वर्षांपर्यंतच्या वाणांना सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
-
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘बियाणे’ हा घटक निवडून ऑनलाइन अर्ज करावा. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाईल. शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असणे आणि गटात किमान २५ सभासद असणे आवश्यक आहे. एका गावात एका पिकासाठी जास्तीत जास्त दोन गटांची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.