पाचशे कोटींचे आरोप म्हणजे चावडीवरच्या गप्पा..!
छगन भुजबळ : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्या
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.२३ : कोणी कोणाला ५०० कोटी रुपये दिले नाहीत आणि कोणी ते घेतलेही नाहीत. या केवळ पारावरच्या गप्पा आहेत. अशा गप्पा कोण रेकॉर्ड करतो, हा प्रश्न आहे. भाजपला पैसे द्यायचेच असते, तर त्यांनी स्वतः जाऊन दिले असते; त्यासाठी कोणाचीही मध्यस्थी लागली नसती, अशा शब्दांत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांपेक्षा दुष्काळग्रस्त आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी संपर्क कार्यालयात शुक्रवारी (ता.२३) आयोजित पत्रकार परिषदेत विविध विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.
दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पंचनामे, माहितीची पडताळणी सुरू आहे. ही मोठी प्रक्रिया असून ती पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवता येणार नसून तातडीचा दिलासा म्हणून किमान पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला .हे, लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत फळबागा जगविण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासाठी उपलब्ध जलसाठ्यांमधून पाणी कधी आणि कशा पद्धतीने सोडता येईल, याबाबत अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘अल् निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, यंदाचा उन्हाळाही कडक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढून उपलब्ध साठा आणखी कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करताना आलेल्या अनुभवाच्या आधारे भुजबळ यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. इगतपुरी ते नाशिक आणि पुढे ठाण्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील महत्त्वाच्या कार्यालयांना उडवून देण्याच्या धमकीच्या ई-मेलबाबत बोलताना त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या पंधरा तासांत अन्य राज्यांतील पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘मी गृहमंत्री होतो, त्यामुळे पोलिसांच्या कामकाजाची मला कल्पना आहे. पोलिस या प्रकरणाचाही निश्चितपणे निपटारा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.