भरधाव सिटीलिंक बसमधून वाहकच फेकला रस्त्यावर
अमृतधाम भागात बसच्या धडकेत दोघे तरुण जखमी; वेगाचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक/ इंदिरानगर, ता. २४ : शहरात सिटीलिंक बस आणि वाहनांच्या सुसाट वेगामुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच असून, एकाच दिवसात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बसमधून वाहक बाहेर फेकल्याची आणि बसच्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरानगर भागात गतिरोधकावरून बस उडाल्यामुळे दरवाजा उघडून चालकाचे नियंत्रण नसताना वाहकच रस्त्यावर फेकला गेला, तर अमृतधाम परिसरात बसचालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बस वळविल्याने मोपेडवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे आणि बसच्या अतिवेगामुळे नागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शनिवारी (ता. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास विनयनगर चौकात भरधाव सिटीलिंक बसमधून वाहकच बाहेर फेकला गेला. यामुळे नागरी भागातून जाणाऱ्या बसच्या वेगावर नियंत्रण कुणी आणायचे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत येथील गर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक प्रवीण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार साईनाथ चौफुलीकडे ही बस भरधाव जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या गतिरोधकावर जोरदार उडाली. त्यात बंद असलेला बसचा दरवाजा उघडला आणि तेथे कदाचित उभे असणारे वाहक बाहेर फेकले गेले. चालकाच्या मात्र हे गावीदेखील नव्हते. पुढे असणाऱ्या नागरिकांनी जोरात आवाज देऊन ही बाब लक्षात आणून दिली. वाहकाला मोठी दुखापत झाली असून नागरिकांच्या मदतीने त्याला त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. वारंवार या बसच्या वेगाबाबत तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे जाधव यांनी सांगितले आहे.
सातपूर येथे सिटी लिंक बसच्या धडकेत दोन दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार युवक ठार झाला, असे वारंवार अपघाताच्या घटना घडत असताना शुक्रवारी (ता. २४) रात्री अमृतधाम ते के. के. वाघ कॉलेज सर्व्हिस रोडवर सिटीलिंक बसचालकाने सिग्नल वा कोणतीही पूर्वसूचना न देता बस वळवल्याने झालेल्या अपघातात मोपेडवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पराग संजय पाटील (वय २१, रा. सिडको) हा मित्र श्रीधर प्रकाश कांगणे (वय २१, रा. अमृतधाम) याच्यासह शुक्रवारी रात्री आठ-साडेआठच्या सुमारास मोपेडवरून (एमएच १५ एफएस १४३०) अमृतधामकडून के. के. वाघ महाविद्यालयाकडे सर्व्हिस रोडने जात होते. त्याचवेळी त्यांच्या मोपेडसमोर धावणारी सिटीलिंक बसच्या (एमएच १५ जीव्ही ७८८२) चालकाने वळण घेत असल्याबाबतचा सिग्नल वा पूर्वसूचना न देता बस डावीकडे वळविली. अचानक बसने वळण घेतल्याने मोपेड बसला जाऊन धडकली. यात अपघातामध्ये मोपेडवरील दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले.
--चौकट
गंभीर दुखापत
अपघातामध्ये पराग याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, श्रीधरही गंभीर जखमी झाल्याने जागीच बेशुद्ध झाला होता. दोघांना नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पराग पाटीलच्या फिर्यादीनुसार, संशयित बसचालक कृष्णा देवराम गाडर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.